Breaking News

अपघातात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू नगर-कल्याण रोडवरील घटना

नगर-कल्याण महामार्गावर भाळवणी परिसरातील मैल येथे भिषण अपघात झाला. या अपघातात तीन महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाले आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये प्रतिक बाळासाहेब ठाणगे (वय 20, रा. हिवरे कोरडा), सोमनाथ बाळू गांगुर्डे (वय 19, रा. हिवरे कोरडा), दीपक रंगनाथ गांगुर्डे (वय 21, रा. माळकूप) अशी अपघातात मृत झालेल्या विद्यार्थ्यांची नांवे आहेत.

याबाबत मिळालली माहिती अशी की, नगर - कल्याण रोडवरून महाविद्यालयीन विद्यार्थी मोटारसायकल वरुन नगरहून भाळवणीकडे जात होते. त्यांची मोटारसायकल भाळवणी जवळील दहावा मैल परिसरात आली असताना मुंबईहून नगरकडे जाणार्‍या कारला (क्रमांक एम. एच. 03, सी. पी. 0144) मोटारसायकलची (क्रमांक एम.एच. 16 बी. टी. 2622) समोरासमोर धडक बसली आहे. सदरचा अपघात हा एवढा भीषण होता की, यामध्ये मोटारसायकलवरील तिघेही सुमारे तीस फुट फेकले गेले तर मोटारसायकलचे पार्ट सुमारे 50 फुटांवर विखुरले गेले. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी पारनेर पोलिसांना माहिती दिली. तसेच रुग्णवाहिका बोलावली. यावेळी पाहणार्‍यांनी मोठी गर्दी केली होती.