Breaking News

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू

कोरेगाव, दि. 21 (प्रतिनिधी) : कोरेगाव येथे आज सकाळी सहाच्या सुमारास कोरेगाव-सातारा रस्त्यावर जुन्या ल्हासुर्णे फाट्यासमोर मॉर्निंग वॉकला चाललेल्या युवकाला अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. गणेश विश्‍वासराव बर्गे असे युवकाचे नाव असून त्याचे आज दुपारी कोरेगाव येथील एका मंगल कार्यालयात लग्न होणार होते. 

मंगळवारी सायंकाळी या युवकाची शहरात ग्रामदैवतांच्या देवदर्शनासाठी वरात काढण्यात आली होती. मात्र, आज सकाळी सहाच्या सुमारास ल्हासुरणे फाट्यासमोर मॉर्निंग वॉकला गेलेल्या गणेश याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गणेश याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच कोरेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसरातील लोकांकडून अपघाताबाबत माहिती घेत आहेत. हा अपघात की घातपात हे शोधून काढण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या घटनेने सकाळच्या वेळी फिरायला जाणार्‍या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न किती गंभीर बनला आहे, याचे हे एक जिवंत उदाहरण पहावयास मिळाले आहे. दरम्यान, घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये काय धागेदोरे सापडतात का? याचा तपास पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यास हा अपघात की घातपात याचा पोलिसांना अंदाज येणार आहे.