Breaking News

नऊ विभागातून 14 लाख 85 हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

पुणे : - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षा बुधवार (दि. 21) पासून सुरु होत आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर कोकण या नऊ विभागातून कला, विज्ञान, वाणिज्य व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम) या चार शाखांमधून एकूण 14 लाख, 85 हजार, 132 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 
बारावीची परीक्षा पुनर्रचित अभ्यासक्रमावर घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने महत्वाच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. परीक्षांच्या क ालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी आ ॅनलाईन समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक विभागीय मंडळामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

मागील तीन वर्षांपासून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयासाठी मूळ कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र हे कॅल्क्युलेटर मोबाईल अथवा अन्य इलेक्ट्रॉनिक साधन स्वरूपात नसावे, असेही सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढावी, अधिक जबाबदार भावी पिढी तयार व्हावी यासाठी परीक्षा पद्धतीवरील विश्‍वास वृद्धिंगत होण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना ’गैरमार्गविरुद्ध लढा’ हे अभियान यशस्वी करण्याबाबत सांगण्यात आले आहे. परीक्षांमधील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसविण्यासाठी मंडळामार्फत प्रत्येक जिल्ह्यात सात तर संपूर्ण महाराष्ट्रात 252 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. विशेष महिला भरारी पथक, काही विभागीय मंडळात विशेष भरारी पथके स्थापन क रण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परीक्षा केंद्रांवर भेटी देण्याबाबत सांगण्यात आले आहे. मंडळ सदस्य आणि शासकीय अधिकारी यांच्या परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी व परीक्षा केंद्रांच्या परिसराचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. इंग्रजी आणि गणित यांच्यासारख्या महत्वाच्या पेपरसाठी बैठे पथक देखील नेमण्यात आले आहे.