ग्रामसेवक संजय नांगरे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध
। विळदच्या सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी
अहमदनगर, दि. 09 - नगर तालुक्यातील विळद ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्रामसेवक संजय शांताराम नांगरे यांना दि. 4 जानेवारी रोजी नगर पंचायत समितीत विळदच्या सरपंच मनिषा बाचकर यांचे पती संजय बाचकर यांनी शिवीगाळ व मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे तालुक्यातील ग्रामसेवक भयभीत झाले असून त्यांना संरक्षण मिळावे तसेच विळदच्या सरपंचांनी पदाचा गैरवापर केल्याने त्यांचे सरपंचपद रद्द करण्याची कारवाई करावी अशी मागणी ग्रामसेवक संघटनेचे नगर तालुकाध्यक्ष शहाजी नरसाळे यांनी केली आहे. नांगरे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ तालुका ग्रामसेवक संघटनेने शनिवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी रेश्मा होजगे यांना निवेदन देवून विळद ग्रामपंचायतीचा कारभार अन्य कोणीही ग्रामसेवक स्विकारणार नसल्याचे सांगितले.यावेळी मंगेश पुंड, शितल पेरणे, अशोक जगदाळे, जयराम ठुबे, तुकाराम जाधव, के.एन.भगत, अरविंद शेळके, एस.आर.पुंड, एस.के.कांबळे, बी.बी.वैराळ, डी.एस.अडसुरे, बी.पी.कांडेकर, आर.बी.भोर, नंदराम कोतकर आदींसह ग्रामसेवक उपस्थित होते. याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, विळदच्या सरपंचपतीने केलेल्या मारहाणीमुळे व धमकीमुळे संजय नांगरे यांची कार्यालयीन कामकाज करण्याची मानसिकता राहीलेली नाही. अशा प्रकारच्या घटना तालुक्यातील अनेक ग्रामसेवकांच्याबाबतील वारंवार घडत आहेत. तालुक्यात विविध विकासकामे करताना गावातील अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून ग्रामसेवकांवर बेकायदेशीर कामांसाठी दबाव टाकण्यात येतो. त्यामुळे विकासकामांवर विपरित परिणाम होत आहे. सदरील घटनेत सरपंच पती संजय बाचकर यांनी आपल्या पत्नीकडील सरपंचपदाचा गैरवापर केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शासकीय परिपत्रकानुसार सरपंच रद्दची कारवाई करावी. ग्रामसेवकांच्या संरक्षणासाठी ठोस पावले न उचचलल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
