शिक्षक भरतीच्या मागणीसाठी सोमवारपासून ‘एल्गार सत्याग्रह’
नाशिक, दि. 24, फेब्रुवारी - राज्यात शिक्षक भरती त्वरीत करावी, यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार (दि. 26) पासून डी. टी. एड्., बी. एड्. स्टुडंट असोसिएशनतर्फे मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत एल्गार सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे.
राज्यातील लाखो युवक-युवती या डी. एड्., बी. एड्. पदवी घेऊनही नोकरीपासून वंचित आहेत. राज्य शासनाने यापूर्वी चारवेळा शिक्षक पात्रता परीक्षा घेतली. त्यासह गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षा ऑनलाईन घेतली. मात्र, अद्यापही शिक्षक भरतीबाबत शासनाकडून कार्यवाही झालेली नाही.
त्यामुळे शासन निर्णय 23 जून 2017 च्या निर्णयानुसार 24 हजार रिक्त जागांवरील शिक्षक भरतीसाठी केंद्रीय पद्धतीने त्वरित कार्यवाही करावी, या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांबाबत आंदोलन करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे. त्याची सुरुवात मुंबईतील एल्गार सत्याग्रहाने होईल. या आंदोलनात नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
