Breaking News

खान्देश विकासासाठी विधानसभेत आवाज उठवणार - एकनाथ खडसे

जळगाव, दि. 24, फेब्रुवारी - गेल्या कित्येक दिवसांपासून मंत्रिमंडळाच्या बाहेर असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा खान्देश विकासासाठी एकत्र येणार असल्याची गर्जना केली. त्यासाठी आम्ही सर्व मिळून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभेत प्रसंगी गोंधळ करू, पण खान्देश विकास थांबू देणार नाही, असे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. अमळनेर तालुक्यातील लोणसिम येथे आज दुपारी शेतकरी मेळावा व विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खडसे बोलत होते.


ते म्हणाले, राज्यात कोट्यवधींचे प्रकल्प येत आहेत. मात्र खान्देशासाठी काहीच नाही, त्यामुळे सरकारला जागे करण्याचे काम करून आम्ही खान्देश विकाससाठी आवाज उठवू, असेही खडसे म्हणाले. येथील पाडळसरे प्रकल्पाचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, या प्रकल्पासाठी अनेक वर्षांपासून निधी मिळालेला नसून तो अडगळीत सापडला आहे. त्याच्या पूर्णत्वासाठीही प्रयत्न करणार असल्याचे खडसे म्हणाले. कार्यक्रमानंतर आमदार खडसे यांनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस ललिता पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावरून अनेक चर्चांना उधाण आले आहे. कार्यक्रमात खासदार ए. टी. पाटील, आमदार शिरीष चौधरी, खासदार रक्षा खडसें हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन लोण सिमच्या सरपंच कुमारी अंकिता पाटिल यांनी केले होते.