Breaking News

असा छापला जातो अर्थसंकल्प ......


आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली देशाचा ८८ वा अर्थसंकल्प सादर करणार आहे. संसदेत अर्थमंत्री सादर करतात तो अर्थसंकल्प नेमका कसा छापला जातो, त्यासाठी काय गोपनियता पाळली जाते, अर्थसंकल्प संसदेपर्यंत कसा येतो, याचीही एक मोठी आणि गोपनिय प्रक्रिया आहे.
24 जानेवारी रोजी अर्थ मंत्रालयाचे 250 आणि पीआयबीचे जवळपास 100 अधिकारी आणि कर्मचारी प्रिंटिंग प्रेसमध्ये जातात. ज्यानंतर त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. अर्थमंत्रालयाच्या तळघरामध्ये अत्याधुनिक प्रिंटिंग प्रेस आहे. या कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्याची परवानगी नसते. त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्थाही तिथेच केली जाते. एखादा कर्मचारी आजारी पडल्यास त्याच्यासाठी डॉक्टरलाही जागेवर बोलावलं जातं. तिथे कर्मचारी कुटुंबीयांनाही भेटू शकत नाही.

पीआयबीच्या टीममध्ये माहिती अधिकाऱ्यांसोबतच एनआयसीची टीमही सहभागी होते. सर्व जण अर्थमंत्र्यांचं भाषण संपल्यानंतरच प्रेसमधून बाहेर पडतात.सर्वात शेवटी अर्थमंत्र्यांचं भाषण छापलं जातं. अर्थमंत्र्यांना वाटल्यास ते रात्री 10 वाजताही त्यांच्या भाषणात फेरबदल करु शकतात.

अर्थसंकल्पाच्या आता अडीच हजार प्रती छापल्या जातात, अगोदर ही संख्या आठ हजार होती. अडीच हजारांपैकी जवळपास 800 प्रती खासदारांसाठीच असतात.अर्थ मंत्रालयात माध्यमांना 1 डिसेंबरपासूनच जाण्यास मनाई असते. विशेष परिस्थितीमध्येच विशेष पास देऊन त्यावर पत्रकारांना अर्थ मंत्रालयात सोडलं जातं.