Breaking News

बोंडअळी संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक


बोंड अळीच्या प्रादुर्भावाने शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झालेल्या कपाशीच्या अनुदानाची रक्कम संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर त्वरित जमा करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्ह्याचे पालकमंत्री मा. राम शिंदे यांच्याकडे करण्यात आली. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविण्याचा निर्धार स्वाभिमानीकडून करण्यात आला आहे. कापसाच्या उत्पादनात जिल्ह्यात शेवगाव तालुक्याचा अव्वल क्रमांक असुन यावर्षी तालुक्यात सर्वात जास्त 47 हजार हेक्टर क्षेत्रावर विक्रमी कपाशीची लागवड करण्यात आली. मात्र बोंड अळीच्या प्रादुर्भावाने सुमारे 50 ते 55 हजार शेतकर्‍यांचे कपाशीवरील बोंड अळीच्या संकटाने शेतकर्‍यांचे अर्थकारण पूर्णतः बिघडले आहे. त्याचमुळे शेतकरी राजा हताश झालेला आहे. राज्यात बोंड अळीच्या प्रादुर्भावाने झालेल्या नुकसानीबाबत राज्य शासनाच्यावतीने मदतीची घोषणा करण्यात आली होती. कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा पूर्ण केला असून याबाबतचा अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त बोंड अळीच्या संकटाचा फटका शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना बसला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे अर्थकारण आणखीच अडचणीत आले. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्यांच्या अनुदानाची रक्कम त्वरित द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी पालकमंत्री व जिल्हा कृषीअधिकारी यांच्यासह संबंधितांना याबाबतचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनावर तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब फटांगडे, भिमराज भडके, दादा पाचरणे, अमोल पालवे, मुकूंद लव्हाट आदी पदाधिकार्‍यांच्या सह्या आहेत.