Breaking News

रुग्णवाहिके अभावी वृद्धाचा मृत्यू

सिंधुदुर्ग, दि. 01, फेब्रुवारी - सावंतवाडी तालुक्यात बांदा येथील प्राथमिक आरोग्य पेंद्रात असलेल्या 108 रुग्णवाहिकेच्या गैरसोयीमुळे शेर्ले-कापईवाडी येथील विश्‍वनाथ सदाशिव धुरी यांना प्राण गमवावा लागला. बांदा परिसरातील ग्रामस्थांनी 108 रुग्णवाहिकेच्या प्रशासनाबाबत आक्रमक पवित्रा घेतला. रुग्णवाहिकेत डॉक्टर नसेल तर, यापुढे याद राखा’’, असा निर्वाणीचा इशाराही ग्रामस्थांनी दिला.


ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर रुग्णवाहिका चालकांने बांद्यातून पळ काढला. रुग्णवाहिकेच्या गैरसोयीमुळे महिनाभरात चौघांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत 108 रुग्णवाहिका बांदा येथे आली नव्हती.
शेर्ले-कापईवाडी येथील विश्‍वनाथ सदाशिव धुरी (58) हे सकाळी कामाला जात असताना त्यांना गडगेवाडी येथे अत्यवस्थ वाटू लागल्याने बांदा ग्रामस्थांनी बांदा प्राथमिक आरोग्य केद्रात नऊ वाजता दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली कासार यांनी धुरी यांची तपासणी केली असता त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. प्राथमिक उपचार करीत त्यांनी उपस्थित नातेवाईकांना लागलीच रुग्णाला गोवा येथे हलविण्यास सांगितले. 

यावेळी नातेवाईकांनी रुग्णवाहिकेला फोन केला. त्याचदरम्यान बांदा प्राथमिक आरोग्य केद्रांत रुग्णवाहिका उपलब्ध होती. मात्र, चालकाने डॉक्टर नसल्याचे सांगितले. फोन केलेली रुग्णवाहिका सावंतवाडी येथून तब्बल पाऊण तासानंतर आली. तोपर्यंत रक्तदाब कमी झाल्याने धुरी यांचा दहा वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झाला. विश्‍वनाथ धुरी यांचा रंगकामाचा व्यवसाय असल्याने ते परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच बांदा परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुली, भाऊ असा परिवार आहे.
बांदा परिसरातील ग्रामस्थांनी 108 रुग्णवाहिकेच्या प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णवाहिकेत डॉक्टर नसेल तर बांद्यात गाडी दिसता नये, असा गर्भित इशारा उपस्थितांनी दिला. 

यानंतर सावंतवाडी व बांदा या दोन्ही रुग्णवाहिकांच्या चालकांनी तेथून पळ काढला. यावेळी शेर्ले सरपंच उदय धुरी, बांदा उपसरपंच अक्रम खान यांनी 108 रुग्णवाहिकेच्या वरिष्ठांशी मोबाईलवर चर्चा करीत चांगलेच ठणकावून काढले. बांदा उपसरपंच अक्रम खान यांनी रुग्णवाहिकांचे जिल्हा अधिकारी घाडगे व शिक्षण, आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ यांनाही माहिती दिली. शेर्ले सरपंच उदय धुरी यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्याशी चर्चा करीत यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली. सावंतवाडी भाजपचे तालुकाउपाध्यक्ष महेश धुरी यांनी या ठिकाणी दोन दिवसात कायमस्वरुपी डॉक्टरसह रुग्णवाहिका उपलब्ध न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत जिल्हा 108 रुग्णवाहिकाचे प्रमुख घाडगे यांना विचारले असता या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध असून ते सकाळी आठ वाजल्यापासून बांदा येथे हजर असल्याचे सांगितले. डॉ. सुधाकर पाटील म्हणून या ठिकाणी नवीन डॉक्टर असल्याचे घाडगे यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी डॉक्टर नसल्याने वरिष्ठांचे नेमके किती लक्ष या अत्याधुनिक सेवेकडे असते हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.