Breaking News

जिल्हा बँकेतील वीजबिल भरणा 1 फेब्रुवारीपासून बंद

सिंधुदुर्गनगरी, दि. 01, फेब्रुवारी - सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखेतील वीजबिल भरणा केंद्रे 1 फेब्रुवारी, 2018 पासून बंद करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. महावितरणने सर्व वीजबिल भरणा केंद्रे ऑनलाईन करण्याचे ठरविले असून जिल्हा बँकेकडे मागील काही महिन्यांपासून ‘ऑनलाईन’चा पाठपुरावा करुनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने कंपनीला नाईलाजास्तव हे पाऊल उचलावे लागले आहे. जिल्हा बँकेशिवाय सहकारी पतसंस्था, महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे, मोबाईल प व मोबाईल वॅलेट्सच्या माध्यमातून घरबसल्या ऑनलाईन भरणे असे अनेक पर्याय ग्राहकांना उपलब्ध केल्याने वीजग्राहकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता महावितरणने घेतली आहे.


ग्राहकांनी भरलेल्या वीजबिलाचे पैसे त्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग व्हावेत व महावितरणला कंपनीचा महसूल वेळेत मिळावा याकारणांसाठी महावितरणने राज्यातील सर्व वीजबिल भरणा केंद्रे ऑनलाईन केली आहेत. खाजगी पतसंस्था व खाजगी सहकारी बँकांनी ऑनलाईन प्रणाली स्विकारली आहे. मात्र जिल्हा बँकेकडून त्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकेच्या 102 शाखेतील वीजबिलांचा भरणा 1 फेब्रुवारीपासून बंद होणार आहे. मात्र ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी 337 पोस्ट ऑफीस, 2 पतसंस्था, महावितरणची भरणा केंद्रे नियमितपणे कार्यरत आहेत. ही सर्व भरणा केंद्रे ऑनलाईन असल्याने कोणताही ग्राहक कोणत्याही केंद्रावर वीजबिल भरु शकतो. बील भरण्यासाठी मोबाईलवर मिळालेला वीजबिलाचा संदेश दाखविल्यास भरणा स्विकारला जातो.