Breaking News

व्हिडिओ बनवून साडेसात लाखांना केले ब्लॅकमेल

पुणे, दि. 01, फेब्रुवारी - बिबवेवाडी परिसरात एका 13 वर्षाच्या मुलाला त्याच्याच मित्रांनी सिगारेट ओढण्यास देऊन त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर पब्लिश करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून वेळोवेळी तब्बल सात लाख 55 हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला. आईला घरातील दागिने न सापडल्यामुळे वडिलांनी विचारणा केली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन सोनारांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. रेवन सिद्ध शिलवंत (वय 45, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्या सोनाराचे नाव असून त्याने दोघा अल्पवयीन मुलांकडून ते दागिने विकत घेतले आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वसतीगृह चालक आहेत. त्यांना आई-वडील, पत्नी व दोन मुले, असा त्यांचा कुटुंब आहे. पीडित हा त्यांचा लहान मुलगा आहे. तर मोठा मुलगा हा बारावीत शिकत आहे. दरम्यान, 18 जानेवारीला त्यांच्या नातेवाईकांच्या मलाचा बारशाचा कार्यक्रम होता. यावेळी पीडित मुलाच्या आईने घरातील पोटमोळ्यावरील कापाटात ठेवलेले दागिने काढण्यासाठी पाहिले असता तेथे दागिने मिळाले नाही. त्यानंतर घरात इतरत्र शोधूनही दागिने न मिळाल्याने फिर्यादींनी आपल्या दोन्ही मुलांना खडसावून विचारले असता. लहान मुलगा पीडित हा एकदम रडू लागला. फिर्यादींनी त्याला विश्‍वासात घेऊन रडण्याचे कारण विचारल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या दोन मित्रांनी व आरोपी वांद्रे याने त्याला सिगारेट ओढायचे शिकवून सिगरेट ओढत असताना त्याची मोबाईलवर व्हिडिओक्लिप बनवली. त्यानंतर त्याला पैशासाठी ब्लॅकमेल केले. पैसे न दिल्यास हा व्हिडिओ तुझ्या वडिलांना दाखवू तसेच सोशल मीडियावर अपलोड करू अशी धमकी दिली. 
दरम्यान, भीतीपोटी मुलाने फिर्यादींच्या खिशातील पैसे व दागिने या दोन्ही मुलांना दिले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. यामध्ये 9 तोळे वजण्याच्या प्रत्येकी तीन तोळे वजनाच्या 2 लाख 25 हजारांच्या तीन वेढण्या, 7 तोळ्याचे 1 लाख 75 हजारांचे गंठण, पाच तोळ्याचा एक लाख 25 हजार रुपयांचा राणीहार, 5 तोळे वजनाची 1 लाख 25 हजारांची वेढणी, 37 हजार रूपयांचा दिड तोडे वजनाची कर्णफुले, 25 हजारांची एक तोळ्याची खडयाची सोन्याची अंगठी, 35 हजार रूपयांची एक किलो चांदीची विट आणि 8 हजारांची रोकड, असा तब्बल 7 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज या मुलाने भीतीपोटी दोन्ही मित्रांना दिला. त्यापैकी आरोपी वांद्रे याने दोघांकडून हा सर्व ऐवज घेऊन तो सोनार रेवेन शिलवंत याला विकल्याचे पोलीस तपासात उघड झाले.