Breaking News

प्रशासनाने कामकाजात सुधारणा करावी - महेश कांदळगावकर

सिंधुदुर्ग, दि. 01, फेब्रुवारी - मालवण नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित विशेष सभेची टिप्पणी सदस्यांना न मिळाल्याने नगरसेवकांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. पूजा करलकर, नितीन वाळके आणि राजन वराडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर वाळके यांनी प्रशासनाने लोकप्रतिनिधींना गृहीत धरायचे सोडून द्यावे, असे स्पष्टपणे सांगितले. प्रशासनाचे स्पष्ट मत नसल्याने या सभेत निर्णय प्रक्रियेत अडचणी येतील, अशी भीती करलकर यांनी व्यक्त केली. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही प्रशासनाला वारंवार टिप्पणीवरून वाद होत असल्याने प्रशासनाने कामकाजात सुधारणा करावी, असे आदेश दिले.


शहरातील चिवला बीच येथील सौंदर्य वाढविण्यासाठी एलईडी वीजपुरवठा करून उभारणी व कार्यान्वित करण्याच्या कामाला मुदतवाढ देणे आणि मूळ आराखडयात बदल करणे या विषयाची विशेष सभा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. सभा अवघ्या अर्ध्यातासात आटोपती घेण्यात आली. नगरसेविका पूजा करलकर यांनी ठेकेदाराला मुदत वाढ देण्यास आणि मूळ आराखडयात बदल करण्याच्या विषयावर विरोधी मत नोंदविले. सभागृहात हे दोन्ही ठराव मंजूर करण्यात आले.