Breaking News

गीता आणि कुराणात द्वेषभावनेचा जराही लवलेश नाही : डॉ. खान शास्त्री

श्रीमद्भवद्गीता आणि कुराण यांची केवळ लिपी भिन्न आहे. बारकाईने अभ्यास केला तर दोन्हींचा गाभा एकच आहे. दोन्ही ग्रंथ सद्भावना, बंधुत्व आणि मानवतेचा पुरस्कार करणारे आहेत. द्वेषभावनेचा जराही लवलेश या महान ग्रंथांमध्ये नाही, असे स्पष्ट प्रतिपादन संस्कृतचे गाढे अभ्यासक डॉ. मोहंमद हनीफ खान शास्त्री यांनी आज येथे केले.


येथील गीता परिवाराच्यावतीने भंडारी मंगल कार्यलयात ‘गीतेतील वैश्विक विचार’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात त्यांनी हे विचार सप्रमाण मांडले. संगमनेरमधील सर्वधर्मीय जिज्ञासू नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद आणि हजारोंच्या उपस्थितीत हे व्याख्यान झाले. सव्वा तासाच्या या व्याख्यानात डॉ. खान शास्त्री यांनी वेद, गीता, कुराण, अरण्यके, उपनिषदे यातील अनेक दाखले दिले. ते म्हणाले, या दोन्ही ग्रंथांची शिकवण मानवतेच्या मुल्यांचा पुरस्कार करणारी आहे. तिरस्काराला त्यात तसूभरही वाव नाही. यावेळी गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, संगमनेर शाखाप्रमुख सतीश इटप आदी प्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते. या व्याख्यान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. भगवान जोशी होते.