Breaking News

राज्य राखीव दलाची संकल्पना शिवरायांचीच : प्रा. बानगुडे


कोेपरगाव : प्रतिनिधी ;- रयतेचे राज्य प्रत्यक्षात येऊन सर्व जनतेचे कल्याण करणारे एकमेव जाणते राजे शिवराय होते. राज्य उभे करणे सोपे आहे. पण ते टिकवणे अवघड आहे. जुलूम, अत्याचार, अन्याय यापासून रयतेची सुटका करून त्यांच्या पोटाला काम मिळेल, अशी व्यवस्था शिवरायांनी निर्माण केली होती. प्रत्येक प्रांतात त्यांनी कर्तृत्व गाजवले. राज्य राखीव दलाची संकल्पनाही शिवरायांनीच सर्वप्रथम सुरू केली, असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे यांनी केले.

येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक विवेक कोल्हे यांच्या पुढाकारातून शहरातील अश्वारूढ शिवाजी पुतळयासमोर शिवजयंतीनिमित्त प्रा. बानुगडे यांचे बुधवारी {दि. २१} व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेलीव ते बोलत होते. प्रारंभी विवेक कोल्हे यांनी प्रास्तविक केले. यावर्षी शिवनेरी गडावर जाऊन किल्ल्यात साफसफाई स्वच्छता अभियान राबविले. त्याचप्रमाणे तेथे वृक्षारोपणही केल्याचे कोल्हे यांनी प्रास्तविकात सांगितले. दरम्यान, व्याख्यानप्रसंगी संजीवनी फाउंडेशनचे सुमित कोल्हे, उपनगराध्यक्ष विजय वाजे आदींसह सर्वपक्षीय नागरिक, संजीवनी कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रा. बानुगडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी दुस-यांच्या भरवशावर न राहता हिंदवी स्वराज्याचा पाया स्वतःच रचला. म्हणूनच त्यांचे ‘सुराज्य’ कधीच कोसळले नाही. ते पराक्रमी शूरवीर, चारित्र्यसंपन्न, कर्तृत्ववान आणि नौदलतातील पहिले आरमार उभे करणारे राजे होते. आजच्या प्राप्त परिस्थितीत छत्रपती शिवरायांचा आदर्श घेत जगण्याचे पर्याय जेंव्हा आपण स्वतःच निर्माण करू, तेंव्हा या देशातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. माणसांची पारख करण्याची कला शिवाजी महाराजांकडून शिकावी. ज्याच्या मनात पराभव येतो, तो रणांत कधीही जिंकू शकत नाही. ज्ञान मिळविण्यासाठी सर्वांनी नम्र व्हावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती उत्सव साजरे करतांना त्यांना डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात घेतल्यास संपूर्ण रयतेचे भले होईल. छत्रपती शिवराय आंतरराष्ट्रीय किर्तीचे सरसेनापती होते. दरम्यान, याप्रसंगी बालकलाकार संकेत गाडे, पियुश लोखंडे, अक्षय ठोंबरे, उर्जा निर्मळ यांनी हिंदवी स्वराज्याचे किस्से ऐकविले. सचिन शिल्लक, शाहिर शिवराज यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब पानगव्हाणे, वैभव आढाव आणि त्यांच्या सहका-यांनी पुढाकार घेतला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योगतज्ञ नितीन घायवट यांनी यावेळी योग प्रात्याक्षिके सादर केली. संदीप जाधव यांनी शिवबाची गाणी व पोवाडे सादर केले. प्रा. साहेबराव दवंगे यांनी सूत्रसंचालन करत उपस्थितीतांचे आभार मानले.