Breaking News

पेठ तालुका मजूरी अपहार प्रकरणाने खोदली कृषी खात्याच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे

नाशिक/ प्रतिनिधी ;- पेठ तालुका कृषी विभागाने मजूरीवर टाकलेल्या दरोड्याची पाळेमुळे खोदतांना या विभागात भ्रष्टाचाराची खदान सापडली आहे.केवळ पेठ तालुकाच नव्हे तर इगतपुरी तालुक्यातही कृषी खात्याच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगणारा भ्रष्टाचार उघड झाला आहे.भ्रष्टाचाराचा हा प्रवास केवळ या दोन तालुक्यापुरता मर्यादीत नसून अन्य तालुक्यांमध्येही त्याचे लोण पसरले असल्याचे संकेत मिळू लागल्याने जिल्हा कृषी खात्याची उच्चस्तरीय चौकशी होण्याची मागणी जोर धरू पहात आहे.


पेठ तालुका कृषी खात्यात सन 2011 ते 2016 या कार्यकाळात कार्यरत असलेल्या तालुका कृषी अधिकारी, पर्यवेक्षक व तत्सम कर्यचारी अधिकार्यांनी संगनमत करून मजूरांच्या मजूरीत घोळ केल्याची तक्रार प्राप्त आहे.यावर गेल्या चार दिवसांपासून लोकमंथनने वृत्तमालिका सुरू केली आहे.या प्रकरणाच्या मुळाशी जात असताना पेठ तालुक्यात ठिक ठिकाणी केलेल्या भ्रष्टाचारी खदान लोकमंथनला सापडली आहे.पेठ तालुक्यात या कार्यकाळात तालुका कृषी खात्यात कार्यरत असलेल्या मंडळींनी शासकीय निधीचा आपल्या इच्छेप्रमाणे कसा गैरवापर करून अपहार केला याची जंञीच हाती आली आहे.


पेठ तालुक्यात मंजूर पाणलोट क्षेञ,जलयुक्त योजना आणि दगडी बांध यांची संख्या ,प्रत्यक्ष झालेले काम यात मोठे अंतर आढळून येत आहे.मंजूर झालेला निधी कागदावर र्च दाखविला गेला असला तरी अनेक ठिकाणी कामे अस्तित्वातच नाहीत.म्हणजे या कामांना कागदावर दाखवून खर्चाचा हिशेबही दप्तरी दाखल केला.आणि हा निधी या मंडळींनी स्वतः खिशात घातला.केवळ पेठमध्ये नाही तर इगतपुरी तालुक्यात हीच बोंब सुरू असून अन्य तेरा तालुक्यातही भ्रष्टाचाराने पाय पसरले आहेत.एकट्या पेठ तालुक्यात भ्रष्टाचाराचा हा आकडा 11ते 13 कोटींचा सांगीतला जात असून जिल्ह्यात सर्व तालुक्यांचा हा आकडा पन्नास कोटींची मर्यादा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पार्श्‍वभूमीवर तालुका कृषी कार्यालयाच्या कारभारासह जिल्हा कृषी खात्याचीही उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरीत आहे.(क्रमशः)