Breaking News

उमेदवारी नाकारल्यास आ. कांबळेंची दुसऱ्या चिन्हावर लढत ‘हॅट्रिक’ करणार?


श्रीरामपूर प्रतिनिधी :- विधानसभा मतदार संघ हा राखीव आहे. मात्र या मतदार संघावर विद्यमान आ. भाऊसाहेब कांबळे यांची मजबूत पकड आहे. गेली दोन पंचवार्षिक आ. कांबळे हे काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकले. परंतु यावेळी काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी आ. कांबळे यांनी दर्शविली आहे. या निवडणुकीत आ. कांबळे ‘हॅट्रिक’ करणार का, अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे. 
आ. कांबळे यांना राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जयंत ससाणे यांनी सलग दोन वेळा काँग्रेसची उमेदवारी दिली. आ. कांबळे यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून चौरंगी लढत असतानादेखील जनतेने त्यांना निवडून दिले. दरम्यानच्या काळात आ. कांबळे यांनी ससाणे यांना सोडचिठ्ठी देत माजी आ. भानुदास मुरकुटे, दीपक पटारे, बबन मुठे यांनी तयार केलेल्या आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्यांचे आमदार म्हणून आ. कांबळे यांची मतदारसंघात ओळख आहे. ते सध्या ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात काम करून सर्वसामान्य जनतेच्या मनात ‘घर’ करण्याचे काम करत आहेत. ग्रामीण भागातील रस्ते, पाटपाणी, चारी दुरुस्ती अनेक ठिकाणी हायमॅक्स, व्यायाम शाळा, सभा मंडप आदी अनेक कामे सध्या आ. कांबळे करत आहेत. श्रीरामपूर तालुक्याला जोडलेली गावाकडेदेखील आ. कांबळे हे तितक्याच विशेष प्रयत्नाने लक्ष देत आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातदेखील आमदार कांबळे यांनी अनेक रस्त्याचे कामे केली आहेत. नुकतेच त्यांनी तालूक्यातील अनेक शाळांना संगणक दिले आहेत. आ. कांबळे यांना श्रीरामपूर व देवळाली प्रवरा अशा दोन नगर पालिका मतदार संघात विकासकामांच्या दृष्टीने लक्ष द्यावे लागते. तसेच प्रवरा नदीकाठचे सहा गावे विखे यांना मानणारे असूनदेखील आ. कांबळेंनी या भागाकडे लक्ष दिल्याने ही गावेदेखील आ. कांबळेंची समर्थक बनली आहेत. आ. कांबळे सध्या विधानसभेची जोरदार तयारी करत आहेत. आ. कांबळे यांना काँग्रेस ने उमेदवारी दिली नाही तर ते दुसऱ्या पक्षाकडून लढण्याची शक्यता आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात गेली १० वर्षे आमदारकी असल्याने अनेक प्रश्न कांबळे यांनी मार्गी लावले आहेत. सध्या गाजत असलेला जिल्हा विभाजन कांबळेच्या काळात झाल्यास त्याचे श्रेय त्यांना मिळणार आहे. त्यामुळे ते जिल्हा विभाजनासाठी मंत्रीमहोदयांची भेट घेत आहेत. त्यांचे पुत्र संतोष कांबळे हे श्रीरामपूर पालिकेचे नगरसेवक आहेत. त्यांचादेखील शहरात मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे आ. कांबळे यांना त्याचाही मोठा फायदा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आ. कांबळे हे सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून जातील का, याबाबत तालुक्यात चर्चेला मोठे उधाण आले आहे.