Breaking News

बनावट दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त; एकाला अटक

जळगाव, दि. 01, फेब्रुवारी - चाळीसगाव शहरातील गणेश रोडवरील बनावट देशी व विदेशी दारू तयार करण्याचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक विभागीय भरारी पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला. बुधवारी, सकाळी 6.30 वाजता भरारी पथकाने ही कारवाई केली. भरारी पथकाने तेथून बनावट दारू तयार करण्याचे साहित्य व स्पिरीट असा सुमारे दिड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला अटक केली आहे.


शहरात एका ठिकाणी बनावट देशी विदेशी दारू तयार केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकास मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने सकाळी 6 वाजता बसस्थानकालगतच्या गणेश रोडवरील मिलन गादी भांडार नजीकच्या घर क्र. 12829 या ठिकाणी छापा टाकला. तेथे त्यांना मनोज सदाशिव मांडगे हा बनावट मद्य करीत असतांना सापडला. परराज्यातून अवैधरित्या स्पिरीट आणून त्यापासून बनावट देशी विदेशी मद्य तयार करून रिकाम्या बाटल्यात भरून त्यास बनावट बुच लावून विक्री करण्याचे कारस्थान सुरू होते. पोलिसांना तेथून देशी विदेशी दारूच्या बाटल्याचे खोके, 10 हजार बनावट बुच, 210 लीटर स्पिरीट, बॉटलिंग मशिन असा 1 लाख 53 हजाराचा मुददेमाल जप्त केला. मनोज मांडगे हा घरात बनावट दारू तयार करण्याचा कारखाना चालवत होता. त्याला चाळीसगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.