Breaking News

एप्रिलपर्यंत ऑफलाईन वेतनाने शिक्षकांना दिलासा !

ठाणे, दि. 25, फेब्रुवारी - ‘शालार्थ’ संगणक प्रणाली क्रॅश झाल्यामुळे शिक्षकांचे पगार रखडल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता एप्रिलपर्यंत ऑफलाईन वेतन देण्याचा सरकारने निर्णय घेतल्यामुळे हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांनी अपर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांची भेट घेतल्यानंतर आ ॅफलाईनबाबत अध्यादेश काढण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 


शिक्षण विभागाकडून शिक्षकांचे पगार देण्यासाठी ‘शालार्थ’ संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. मात्र, दोन महिन्यांपासून ही प्रणाली क्रॅश झाल्यामुळे हजारो शिक्षकांचे पगार रखडले होते. त्यामुळे घराचे हप्ते व मुलांची शाळेची फी भरण्यास शिक्षकांना अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्य सरकारने जानेवारी व फेब्रुवारीचा ऑफलाईनने पगार दिला. मात्र, ‘शालार्थ’मधील बिघाड दूर न झाल्यास पुढील महिन्यातही पगार रखडण्याची भीती होती. या पार्श्‍वभूमीवर आमदार निरंजन डावखरे यांनी एप्रिलपर्यंत ऑफलाईन पगार होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी या संदर्भात राज्य सरकारच्या वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांची भेट घेतली होती. तसेच एप्रिलपर्यंत ऑफलाईन वेतन देण्याची मागणी केली. त्याला जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागांना तातडीने प्रस्ताव तयार करण्याचा आदेश दिला. त्यानंतर अध्यादेश काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. अखेर राज्य सरकारने अध्यादेश जारी केल्यामुळे शिक्षकांना एप्रिलपर्यंत ऑफलाईन वेतन मिळणार आहे. या निर्णयामुळे हजारो शिक्षकांना ए प्रिलपर्यंत दिलासा मिळाला आहे.