Breaking News

जानेफळ येथील शौचालय बांधकामाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अधिकारी,कर्मचार्यांची धावपळ

जानेफळ,(प्रतिनिधी): स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बुलडाणा जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गाव हे हागणदरीमुक्त करण्याच्या उद्देशाने व हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जि.प.अधिकारी व कर्मचारी यांची चांगलीच धावपळ सुरु आहे. दि.12 फेब्रुवारी रोजी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली जानेफळमध्ये शौचालयांच्या बांधकामासंबंधी माहिती देण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जळगाव जामोद पं.स.चे गटविकास अधिकारी समाधान सोनवणे, शेगाव पं.स.चे कृषी अधिकारी पी.एन.देशमुख, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी महिला कर्मचारी, आशा महिला कर्मचारी या सर्वांचा मोठा ताफा भल्या पहाटेच जानेफळमध्ये येवून धडकला. त्यांनी सरपंच व उपसरपंच यांच्या मदतीने व काही ग्रामपंचायत सदस्य यांच्या मदतीने वार्डनिहाय शौचालय नसलेल्या लोकांची यादी घेवून त्या पद्धतीने प्रत्येकाला एक जबाबदारी देत अख्खा गाव पिंजून काढला. 

ग्रामीण भागातील प्रत्येक गाव हागणदरीमुक्त झाले पाहिजे यासाठी शासनाकडून कशा प्रकारे या बांधकामास निधी मिळतो व प्रत्येक कुटुंबाने शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करावा आणि आपले आरोग्य निरोगी राहिले पाहिजे हाच शासनाचा उद्देश असल्याचे संबंधित अधिकारी गावातील नागरिकांना सांगत होते. तसेच जानेफळमध्ये वार्डनिहाय मिळालेल्या माहितीनुसार फक्त 257 लोकांचे शौचालय बांधकाम बाकी असल्याची माहिती सांगण्यात आली. यापैकीसुद्धा काही घरी जावून संबंधित अधिकारी यांनी भेटी दिल्या असता त्यातील बर्याच नागरिकांचे शौचालय बांधकाम सुरु असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. लवकरच जानेफळ हे गाव हागणदरीमुक्त होणार असल्याचे बोलले जात आहे व त्यातच नव्या दमाचे सरपंच व तडफदार उपसरपंच गावाला लाभल्याने नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सदर ग्राम भेटीदरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नवनियुक्त सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी श्रीकृष्ण काकडे, सैयद महेबुबभाई, गणेश सवडतकर आदींसह ग्रा.पं.कर्मचारी हजर होते.