Breaking News

सिंधुदुर्गपुत्र सुभेदार अजय सावंत याचे घोडेस्वारीत यश

सिंधुदुर्गनगरी, दि. 20, फेब्रुवारी - भारतीय सैन्यदलातील दिल्ली येथे सुभेदार पदावर असलेल्या अजय सावंत या महाराष्ट्राच्या सुपुत्राने घोडस्वारीमध्ये भारताचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला. जानेवारी 2018 मध्ये ऑस्ट्रेलियातील थोमर शहरात झालेल्या क्वालिफाय राउंडमध्ये त्यांनी तीन सुवर्णपदकांसह दोन रौप्य आणि एक कांस्य अशी सहा पदके मिळवली. त्यांनी पाकिस्तानला नमवत ऑगस्ट 2018 मध्ये आबुधाबी (युएई) येथे होणार्‍या जागतिक घोडस्वारी स्पर्धेच्या पात्र गटातल स्वतःच आणि भारताचे स्थान पक्के केले. जगातील सात देश या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातले तीन देश क्वालिफाय ठरले, त्यात भारताचे स्थान अव्वल आहे.


सुभेदार अजय सावंत दोडामार्ग तालुक्यातील सरगवे गावचे. तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पामुळे सरगवेसह आयनोडे, पाट्ये, शिरंगे, केंद्रे, पाल आदि गावे विस्थापित झाली. सावंत तिलारी प्रकल्पग्रस्त. वडील सैन्यदलात, त्यामुळे त्यांचे शिक्षण बेळगावात सैनिक स्कूलमध्ये झाले. खेळ हा त्यांचा आवडता विषय. सैन्यदलातही त्यांनी ती आवड जोपासली; नव्हे तिथे मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले. जवळपास पंचवीस वर्षे ते सैन्यदलात आहेत. या काळात त्यांनी जगभरातल्या अनेक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून देशाला घोडेस्वारीमध्ये अनेक पदके आणि सन्मान मिळवून दिला. 2014 मध्ये सुदान मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी पाच पदके मिळवली. त्यात दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक होते. त्या स्पर्धेत बारा देश सहभागी झाले होते.
2015 मध्ये भारतात ’इंडिया इंटरनॅशनल गेम’ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा झाली. त्यात त्यांनी चार सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्य अशी नऊ पदके मिळवली. त्या स्पर्धेत चौदा देश सहभागी झाले होते.