Breaking News

शेडगावच्या सरपंचाना अपात्र ठरवण्याची मागणी


श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील सरपंचाने दलित वस्तीतील जुन्या चावडीचे सागवान लाकडे परस्पर विक्री करून रकमेचा अपहार केला आहे. त्यामुळे सरपंच शेंडे यांना अपात्र ठरविण्यात यावे. अशी मागणी शेडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य महेंद्र रणसिंग व अमोल झेंडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाने केली आहे. 
याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की ,श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील दलित वस्तीत जुन्या काळातील चावडी होती. या चावडीचे बांधकाम अतिशय जुने आहे. पण सरपंच विजय शेंडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून या चावडीचे जुने सागवान लाकडे कोणताही लिलाव अथवा शासकीय परवानगी न घेता लाकडांची विक्री केली. त्यातून मिळालेली रक्कमेचा अपहार करून स्वतःचा फायद्यासाठी वापरली. या घटनेनंतर ग्रामपंचायत सदस्य महेंद्र रणसिंग व अमोल झेंडे यांनी दि ४ जानेवारी१८ रोजी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे या गैरव्यवहाराची तक्रार केली.

 या तक्रारीनंतर सरपंच शेंडे यांनी दि. ८ जानेवारी१८ रोजी ग्रामपंचायत खात्यात सागवानाच्या विक्रीतून आलेले ३५ हजार रुपये रक्कम जमा केली. त्यानंतर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या चौकशीत सरपंच हे प्रथमदर्शनी दोषी असल्याचे आढळले आहेत. त्याबाबत पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे पुढील कारवाईसाठी प्रकरण पाठविले आहे. पण पंचायत समितीच्या चौकशीतच सरपंच दोषी असल्याचे दिसून येत असल्यामुळे सरपंच शेंडे यांना पदावरून दूर करण्यात यावे. अशी मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात रणसिंग व शेंडे यांनी केली आहे . 

दोषींवर कारवाई होणे गरजेचे -महेंद्र रणसिंग 
शेडगाव ग्रामपंचायती मध्ये मी स्वतः सदस्य म्हणून काम करीत आहे. पण दलित वस्तीमधील जुन्या चावडीचे सागवान विक्री करताना सरपंचाने कोणतीच कायदेशीर प्रक्रिया पार पाडली नाही. या उलट त्यातून मिळालेली रक्कम स्वतः वापरली व आम्ही तक्रार केल्यावर ती रक्कम ग्रामपंचायत खात्यात भरली. त्यामुळे त्यांचा दोष सिद्ध झाला असून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवावे. तसेच दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी महेंद्र रणसिंग यांनी केली आहे.