Breaking News

अग्रलेख - राजस्थानमध्ये भाजपच्या विजयाला ब्रेक


सुसाट वेगाने निघालेल्या गाडींचा जेव्हा अपघात होतो, तेव्हा त्या गाडीचे अवशेष देखील शिल्लक राहत नाही. मात्र जर ताळतंत्र ठेवून आपण योग्य गतीने प्रवास करत असू, तर त्यातून आपण सहीसलामत सुटतो, आणि योग्यस्थळी पोहचतो. तशीच काहीसी अवस्था आज भाजपची झाली आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. नरेंद्र मोदी यांच्या वलयामुळे, त्यांच्या हजरजवाबी वक्तव्यामुळे, अच्छे दिनाच्या स्वप्नामुळे भाजपची गाडी सुसाट सुटली होती. या गाडीला बे्रक लागेल, असे भाजपमधील कोणत्याही व्यक्तीला वाटले नव्हते. कारण मागील दोन-ते अडीच वर्षांत भाजपला म्हणावी तशी झळ पोहचली नव्हती. त्यामुळे आपला ट्रक योग्य आहे, असा भास भाजपला सारखा होत होता. त्यामुळे भाजपने आपली चिकित्सा करणे सोडून विरोधी पक्षांवर तोंडसुख घेत, विरोधी पक्षांची अवहेलना केली. मात्र आज साडेतीन वर्षांनतर परिस्थितीमध्ये आमुलागे्र बदल झाला असून, विरोधी पक्षांची धार तीव्र झाली आहे. राहूल गांधी यांचे नेतृत्व तावून सुलाखून निघाल्यामुळे पुन्हा एकदा काँगे्रस जोमात असल्याचे चित्र आहे. नुकत्याच झालेल्या पोट निवडणूकीत भाजपचा मानहानीजनक पराभव भाजपच्या सुसाट गाडीवांनाना विचार करायला लावणारा आहे. अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत, सरकारने तीन वर्षांत केलेल्या कामांची पाढा वाचत असताना राजस्थानमध्ये भाजपला नाचक्कीला सामोरे जावे लागले आहे. पराभवामुळे जयपूरच्या भाजपच्या कार्यालयात अक्षरशः शुकशुकाट दिसत होता. यामध्ये महत्वाची अधोरेखित करणारी बाब म्हणजे, या पोटनिवडणूकीतील दोन लोकसभा व एक विधानसभेच्या जागा भाजपकडे होत्या. मात्र काँगे्रसने दमदार पुनरागमन करत, त्या आपल्याकडे खेचून आणल्या. राजस्थानमध्ये लोकसभेच्या अल्वर आणि अजमेर मतदार संघांसाठी तसेच विधानसभेच्या मंडलगड जागेसाठी पोट निवडणूकीमध्ये विजय मिळ विण्यासाठी भाजपाने आपले सर्वस्व पणाला लावले होते. तर याउलट काँगे्रसने भाजपच्या कडव्या हिदुंत्ववादावर प्रहार करत भाजपला जेरीस आणले होते. मंडलगड विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या विवेक धाकड यांनी भाजपच्या शक्ती सिंह यांचा 12 हजार 976 मतांनी पराभव केला. अल्वर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने 48 हजारांहून अधिक मतांची आघाडी घेतल्याने काँग्रेसच्या करण सिंह यांचा विजय झाला आहे. अजमेर लोकसभा मतदारसंघात कांग्रेसने रघू शर्मा यांना रिंगणात उतरविले होते. त्यांनी भाजपच्या राम स्वरूप लांबा यांच्या विरुद्ध 24 हजार 256 मतांची आघाडी घेत त्यांचा पराभव केला. या तिन्ही जागांसाठी भाजप आणि काँग्रेसने आपले सर्वस्व पणाला लावले होते. भाजपकडून स्वतः मुख्यमंत्री वसुंधराराजे प्रचाराच्या रिंगणात उतरल्या होत्या. तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. वास्तविक राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असतांना, दोन्ही लोकसभा पोटनिवडणूकीत काँगे्रसचे हे यश निर्भेळ आहे. तर भाजपच्या गोटात अशांतता पसरवणारे आहे. भाजपला चिंतन करायला लावणारा हा पराभव आहे. विशेष म्हणजे पश्‍चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही ममता बॅनर्जींनी भाजपला धूळ चारली. सत्ताधारी तृणमूलने नोआपाडा विधानसभेची जागा पटकावली असून उलुबेरिया लोकसभेच्या जागेवरही भाजप पराभव झाला आहे. बंगालमध्ये भाजप मूळ रोवण्याचा प्रयत्न करत असताना हा मोठा धक्का मानला जात आहे, मात्र भाजपला दिलासा इतकाच की तिथे काँग्रेसच्या चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे. त्यामुळे विविध राज्यात भाजपच्या विजयाला लागलेला हा बे्रक असून, यातून भाजपने धडा घेण्याची गरज आहे. भाजपला आपले धर्मनिरपेक्षतेचे बेगडी प्रेम सोडून आता कृतीतून आपला धर्मनिरपेक्षतेचे राजकारण दाखवून द्यावे लागणार आहे. राजकारणांसाठी नेहमीच कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणींचा वापर हा नेहमीच सत्ता मिळवून देऊ शकत नाही. त्यामुळे भाजपने आपल्या ध्येय धोरणांत बदल न केल्यास, भाजपचे फार मोठे नुकसान होऊ शकते.