Breaking News

विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने शिवजयंती उत्सव सोहळा


तालुक्यातील धोंडपारगाव येथे शिवजयंती उत्सव सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मर्दानी खेळ मल्लखांबाचे प्रात्यक्षिक करून युवा पिढीला आठवण देत व मिरवणूक आणि शिवव्याख्याते संदीप कदम यांच्या व्याख्यानाने उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वत्र शिवजयंती उत्सवाची धुमधाम चालू असतानाच जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव येथे शिवजयंती उत्सव मोठया दिमाखात साजरा करण्यात आला. घोडयावर बसलेल्या बाल शिवाजीचे प्रतिकात्मक रूप धारण केलेल्या शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली. तसेच मिरवणुकीपुढे हलगी, ताशाच्या वाद्य वृदांने बालचिमुकल्या मुला-मुलींचे लेझीम पथक मिरवणुकीत सहभागी होऊन आपल्या लेझीम कलेचे प्रदर्शन केले. त्यामुळे मिरवणूकीला आगळा वेगळा रंग प्राप्त झाला होता. त्यातच जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी वातावरण प्रसन्न दिसून येत होते. धोंडपारगाव फाटया पासून गावापर्यंत वाजत गाजत मिरवणूक आल्यानंतर आयोजक अखिल भारतीय मराठा महासंघ, विश्‍वरत्न ग्रुप, शंभुराजे प्रतिष्ठान, व छत्रपती प्रतिष्ठान यांच्या नेतृत्वाने पैलवान व अखिल भारतीय मराठा महासंघाचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष दत्तात्रय शिंदे व गावचे सुपुत्र व उद्योजक संतोष पवार तसेच ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शिवप्रतीमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जामखेड तालुक्यातील तेलगंशी येथील मल्लखांब खेळाचे प्रात्यक्षिक करणार्‍या मुलांनी उपस्थितांसमोर मल्लखांबाचे खेळ सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे, शिवव्याख्याते व गडकिल्ले संशोधक संदीप कदम, माजी जि. प. सदस्य मधुकर राळेभात, विश्‍वदर्शन चे संचालक गुलाब जांभळे, पंचायत समितीचे उपसभापती सुर्यकांत मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख शहाजी राजेभोसले, नगरसेवक अमित जाधव, मोहन पवार, नान्नजचे माजी उपसंरपच शरद राजेभोसले, शिवसंग्रामचे युवा नेते शहाजी गोरे, अवधूत पवार, अशोक पठाडेंसह त्यांचे सहकारी शिवप्रेमी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांच्या व मान्यवर यांच्या साक्षीने नवनिर्वाचित अखिल भारतीय मराठा महासंघाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याने कार्यक्रमाचे आयोजक व धोंडपारगाव चे सुपूत्र दत्तात्रय शिंदे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पवार यांनी तर आभार दत्तात्रय शिंदे यांनी मानले. यावेळी प्रमुख अतिथी सभांजी दहातोंडे यांनी आपले विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर शिवव्याख्याते संदीप कदम यांनी आपल्या बुलंद आवाजात व्याख्यान सांगून टाळ्यांची साथ मिळवली.