Breaking News

जामखेड गोळीबार प्रकरणातील दोन मुख्य सुत्रधारांच्या मुसक्या आवळण्यात यश

जामखेड / श. प्रतिनिधी । 03 ः जामखेड गोळीबार प्रकरणातील दोन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळण्यात जामखेड पोलिसांना यश आले. जामखेड पोलीसांनी अवघ्या 48 तासात आरोपींना जेरबंंद केले असुन त्यांना न्यायालयात हजर केले, त्यातील भरत जगदाळे रा. जगदाळे वस्ती, जामखेड आणि शिवाजी काकडे, नाळवंडी ता. पाटोदा. जि. बीड या दोन आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींच्या शोधार्थ पोलीसांची सहा पथके कार्यरत होती. यापैकी जामखेड पोलिसांच्या पथकाने दि. 2 फ्रेब्रु. रोजी पहाटे पहाटे जामखेड तालुक्यातील साकत फाट्यावरून आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. 


सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे, पो. कॉ. गाडे, पो. ना बाबासाहेब बडे, पो. कॉ. गणेश साने, पो.कॉ. शामसुंदर जाधव, पो. ना. शेळके, पो. कॉ. अमीन शेख या पथकाने ही कारवाई केली, प्रकरणातील अन्य आरोपी आद्याप फरार आहेत. याबाबत सविस्तर असे की, बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील नाळवंडी गावची आक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत पराभूत झाल्याचा राग मनात धरून दि. 1 फेब्रुवारी रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात तीन जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. नाळवंडी ता. पाटोदा येथे जानमोहमंद पठाण यांना बेदम मारहाण करत डोंगरकिन्ही घाटातील खड्ड्यात फेकून देण्याबरोबरच अंगांवर गाडी घालून चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, या प्रकरणातील आरोपी शिवाजी काकडे ( रा. पाटोदा. जि. बीड) भरत जगदाळे ( जगदाळे वस्ती, जामखेड ) आपल्या इतर पाच सहा सहकार्‍यांसह जामखेडला स्कॉर्पिओ गाडीतून येऊन पंचायत समितीच्या कार्यालयासमोर डॉ. सादिक पठाण, कय्युम शेख यांच्या मारूती गाडीला आडवी लावून गाडीच्या काचा फोडत अंदाधुंद गोळीबार करून डॉ. सादिक पठाण व कय्युम सुलेमान शेख यांना संपविण्याचा प्रयत्न केला. यात डॉ. सादिक पठाण व कय्युम शेख गंभीररित्या जखमी झाले. तीनही जखमींवर अहमदनगर येथील खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान जामखेड गोळीबार प्रकरणी जामखेडकरांच्या वतीने मंगळवार दि. 9 रोजी मुकमोर्चा काढण्यात येणार असल्याचे फलक चौकाचौकात लावण्यात आले आहेत. दरम्यान जामखेड पोलिसांनी अवघ्या 48 तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्याने जामखेड पोलीस दलाचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.