Breaking News

हुंड्यासाठी पाच दिवसांच्या चिमुकलीच्या जिवाची हेळसांड


जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील आदिवासी पारधी समाजातील किर्ती अशोक पवार व अशोक पवार हे कुटुंब ऊस तोडणीसाठी जेऊर याठिकाणी गेले असता, आठ दिवसांपुर्वी किर्तीची प्रसुती होऊन तिने मुलीला जन्म दिला, परंतु या चिमुकलीचा जन्म होऊन पाच दिवस होताच, तिला आपल्या जन्मदात्या आईपासून दूर करण्याचे क्रुरकृत्य जेऊर येथील पंडराव पाहुण्या काळे या किर्ती च्या वडीलाने केले आहे, आपल्या मुलीचे लग्न करून दिल्यापासून किर्तीचा 5 हजार रूपये हुंडा न मिळाल्याने या हुंड्याचे 5 हजार रुपये का दिले नाही, म्हणून मुलीच्या चिमुकल्या जिवाला घेऊन गेला, असल्याची माहिती लोक अधिकार आंदोलनचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अरूण जाधव यांना समजताच त्यांनी फिर्यादी किर्ती पवार हिस बरोबर घेऊन जामखेड न्यायालयाकडून सर्च वारंट घेतले व खाजगी गाडीतून पोलिसांच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा घेऊन आरोपी व बाळास ताब्यात घेतले. आज रोजी न्यायालय समोर हजर करून आईच्या ताब्यात देण्यात आले, या कामी बाजीराव गंगावणे यांनी घडलेली घटना जामखेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन पगार यांना दिली असता, पोलीस निरीक्षक पगार यांनी चिमुकल्या बाळाची आणि आईची गाठ भेट घडवून देण्यासाठी तातडीने यंत्रणा कामाला लावली. पोलिस हेड कॉन्स्टेबल चव्हाण व पोलिस कॉन्स्टेबल साखरे, ड्रायव्हर बंडू श्रिरामे व बाजीराव गंगावणे यांच्यासह पथक जेऊर याठिकाणी पाठवून पंडराव काळे याला बाळासह ताब्यात घेऊन आज सकाळी लोक अधिकार आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव व पोलिस निरीक्षक नितीन पगार यांच्या उपस्थितीत किर्ती पवार हिच्या ताब्यात बाळ देण्यात आले. आई आणि बाळाची भेट घडवून आणण्यासाठी बापु ओहोळ, संतोष गर्जे व विशाल पवार यांनी परिश्रम घेतले. घडलेल्या सर्व घटनेत स्वतः पुढाकार घेऊन चिमुकल्या बाळाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले पोलिस निरीक्षक पगार यांचे लोक अधिकार आंदोलन संघटनेच्या वतीने अ‍ॅड. डॉ. अरुण जाधव यांनी अभिनंदन केले.