Breaking News

‘राफेल’खरेदीत मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप पंतप्रधान मोदी यांच्यावर राहूल गांधी यांची टीका

नवी दिल्ली : फ्रान्स सोबत झालेल्या राफेल विमानांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केल्यामुळे खळबळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फ्रान्सला जाऊन हा व्यवहार केल्याचा खळबळजनक आरोप गांधी यांनी केला. संसदेबाहेर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी सरकारवर विशेषतः पंतप्रधान मोदींवर थेट टीका केली. 


36 राफेल विमानांच्या खरेदीचा प्रश्‍न सोमवारी संसदेत उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी फ्रान्स आणि भारत या दोन्ही देशांमध्ये या विमानांबाबत महत्त्वाचा करार झाला आहे. या करारानुसारच मी या विमानांच्या किंमतीबाबत काहीही बोलू शकत नाही. गोपनियता पाळण्यासाठीच हा व्यवहार किती रुपयांचा झाला हे सांगता येणार नाही असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांना आणि मोदी सरकारला विरोधकांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागत आहे.ज्यानंतर सपा नेते नरेश अग्रवाल यांनीही या विमान खरेदी प्रकरणाची माहिती समोर आणावी असे आवाहन केले होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनीही ट्विटरवरून संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे. याबाबत राहुल म्हणाले, ‘गुजरात निवडणुकीत आम्ही हाच मुद्दा उपस्थित केला होता. यासाठी स्वतः मोदी पॅरीसला गेले होते. तेथे स्वतः त्यांनी व्यवहारात बदल केले आहेत. संपूर्ण देशाला माहिती आहे आणि संरक्षण मंत्री म्हणत आहेत की, राफेल व्यवहारात किती रुपयांना खरेदी झाली याची माहिती आम्ही देशाला देऊ शकत नाही. यापूर्वी असे कधी घडले आहे का? तुम्ही कधी ऐकले तरी आहे का?’ दहशतीखाली असलेल्या माध्यमांनी याविषयावर आवाज उठवला पाहिजे, असा टोलाही राहुल यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना लगावला.