Breaking News

हमीभावासाठी किसान सभेचा विधानभवनावर मोर्चा

मुंबई : शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असून, आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मंगळवारी (6 मार्च) रोजी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. त्यात नगरसह राज्यभरातील एक लाख शेतकरी सहभागी होणार आहेत अशी माहिती किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली.

शेतकर्‍यांना विनाअट संपूर्ण कर्जमुक्ती द्या व शेतीमालाला दीडपट हमी भावासाठी स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, या प्रमुख मागण्यांसाठी कि सान सभेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात अधिवेशन काळात राज्यभरातून एक लाख शेतकरी नाशिक येथून मुंबई येथे विधानभवनावर पायी चालत येत लाँग मार्च काढणार आहेत. 6 मार्चला या लाँग मार्चची सुरुवात होणार आहे. नाशिक येथून मुंबईपर्यंत पायी चालत आलेले हे शेतकरी अधिवेशन सुरू असताना विधानसभेला बेमुदत महाघेराव घालणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा बेमुदत घेराव सुरू राहणार आहे. लाँग मार्चच्या तयारीसाठी राज्यभर जिल्हा मेळाव्यांचे आयोजन क रण्यात आले आहे. किसान सभेने मार्च 2016 मध्ये नाशिक येथे एक लाख शेतकर्‍यांचा महामुक्काम सत्याग्रह केला होता. नाशिक येथील सीबीएस चौकात राज्यभरातील एक लाख शेतकर्‍यांनी दोन दिवस केलेल्या या महामुक्काम सत्याग्रहाने शेतकर्‍यांचे प्रश्‍न दोन वर्षांपूर्वी सरकार समोर मांडले होते. महामुक्कामाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या.