Breaking News

भाजपच्या अर्थसंकल्पावर जुगारींचाही विश्‍वास नाही : अँड. आंबेडकर

कोपरगाव ता. प्रतिनिधी :- भाजप सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्यांची जादू आहे. याचा सर्वसामान्य माणसाला फटका बसला आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या विश्‍वासाला जगभरात तडा जाण्याची भिती आहे. याचा परिणाम शेअर्स मार्केटवरही झाला असल्याने जुगारींचाही या अर्थसंकल्पावरील विश्‍वास उडाला आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक अँड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलतांना केली. 


आंबेडकर म्हणाले, देशात सध्या आटोक्याच्या बाहेरची स्थिती आहे. शेतकर्‍यांना दीडपट भाववाढ देणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्याबाबतची यंत्रणा शासनाकडे नाही. त्यामुळे ही केवळ सरकारची पोकळ घोषणाबाजी आहे. भाजपाने संपूर्ण देशातील व्यवस्था कोलमडवण्याचे काम चालू केले आहे. शेतकर्‍यांना केवळ आशेचा किरण दाखवला असला तरी सर्वांना महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. दरम्यान, जाहीर सभेत बोलतांना ते म्हणाले, केंद्र सरकारने नोटबंदी करुनही जनतेच्या पदरात काहीच पडले नाही. काळा पैसाही देशात  परत आला नाही. शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मीच एकटा ‘बाळासाहेब’ आहे. या सरकारला तोंड देण्यासाठी मीच सक्षम आहे.

 कोरेगाव भिमा प्रकरणात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, व्यंकटेश, स्वामी यांच्यापुढे सरकारने नांगी टाकली आहे. त्यांना सरकार वाचवत असले तरी यात शासनाबरोबर त्यांचाही बळी गेल्याशिवाय राहणार नाही. आधारकार्ड हे जनतेचा आधार नसून ते ब्लँकमेलिंग कार्ड ठरत आहे. कोरेगाव भिमा प्रकरणात संभाजी भिडे पुढे वाकणारे हे सरकार आहे. त्यांना अटक होणार नसेल तर येत्या निवडणुकात सत्ता परिवर्तन करण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. यावेळी त्यांचे समवेत अमित भुईंगळ, शरद खरात, रविंद्र साबळे, अनिल बनसोडे आदींसह भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.