Breaking News

भिडे, एकबोटेंना भाजप सरकारचे अभय आ. कपिल पाटील यांचा आरोप

पुणे : हिंदुत्ववादी संघटनेचे मिलिंद एकबोटे आणि भिडे गुरूजी यांनी कोरेगाव भीमा येथे दंगल घडवत समाजात फूट पाडण्याचे काम केले आहे. मात्र, या दोघांना राज्य सरकारचे अभय असल्याने त्यांना अद्याप अटक झालेली नाही, अशी टीका शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी रविवारी येथे केली. धर्मा पाटील यांची आत्महत्या हा शेतकरीधर्माचा बळी असून, यास सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांना केला.

राज्य सरकारने राज्यातील शाळा बंद करून रामदेव बाबाच्या शाळा राज्यात सुरू करण्याचा घाट घातला आहे. तसेच राज्य सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला ते म्हणाले राज्यात शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे. राज्यात दीड लाख पद रिक्त असून सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. भाजप सरकार देशभरात जातीय तणाव निर्माण करण्यास खतपाणी घालत आहे. त्यामुळे भाजप सरकार विरोधात एक होणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकार विरोधात 17 पक्ष एकत्र आले आहेत. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या बजेटबाबत बोलताना पाटील म्हणाले जेटलींचे बजेट चाय कम किटली गरम असल्याचे त्यांनी सांगितले.


फॅसिस्ट प्रवृत्तीला पुढे नेण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. पानसरे हत्याप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेला जामीन मिळू शकतो, तर एकबोटे, भिडे यांनाही कुठलीच भीती नाही. धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकार जागे झाले. जिवंत असताना मात्र त्यांना मदत केली नाही. आधी जीव घ्यायचा, नंतर मदत करायची, अशी या सरकारची वृत्ती आहे. देशभरात सर्वत्र जातीधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. यामुळे लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी सर्व सरकारविरोधी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे महत्व पाटील यांनी यावेळी अधोरेखित केले.