Breaking News

लहाडे कुटुंबियांच्या खर्चातुन धोंडीराज महाराज मठ सुशोभीत


कुळधरण/प्रतिनिधी/- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील धोंडीराज महाराज मठाचे सुशोभीकरण काम वेगाने सुरु आहे. बबन नाना लहाडे यांनी स्वखर्चातुन मंदिरासमोर शेड, परिसरातील जागेचे सपाटीकरण, वृक्षारोपण आदी कामे हाती घेतली आहेत. या कामांमुळे मठ परिसराची शोभा वाढली असुन त्यामुळे भाविकांची सोय होत आहे.
कुळधरणच्या पश्चिमेला धोंडीराज महाराज मठ असुन येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरासमोर पावणे दोन लाख रुपये खर्चून शेड बांधकाम करण्यात आल्याने भाविकांची सोय झाली आहे. मंदिरासमोरील जीर्ण वडाचे झाड हटवून जागेचे सपाटीकरण काम सुरु आहे. मंदिरासमोरच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. झाडांना ठिबक सिंचन करण्यात आले आहे. सध्या सुरु असलेल्या विविध विकासकामांमुळे परिसर आकर्षक व सुशोभित बनला आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. मठानजीकच्या दत्तमंदिरात दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. गावाजवळील हे धार्मिक स्थळ असल्याने येथे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह तसेच इतर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले. बंडुकाका लहाडे यांच्या विशेष प्रयत्नातुन व ग्रामस्थांच्या योगदानातुन विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मठात केले जाते.

◾हायमॅक्सने परिसर झाला प्रकाशमय

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या निधीतून मठासमोर हायमॅक्स दिवा बसविण्यात आलेला आहे. यापूर्वी मठासमोर अंधार असायचा ,मात्र हायमॅक्स दिवा बसवल्यामुळे हा परिसर प्रकाशमय बनला आहे.पंचायत समिती सदस्या साधना अंकुश कदम यांच्या निधीतून आणखी एका दिव्याची व्यवस्था केली जाईल अशी माहिती कुळधरण ग्रामविकास संघटनेचे सुधीर जगताप यांनी दिली.