Breaking News

वेदमंत्राच्या जयघोषात श्री कालभैरवनाथांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा


नेवासा/प्रतिनिधी/- नेवासा तालुक्यातील जागृत असलेल्या श्री क्षेत्र बहिरवाडी येथील प्रवरानदीच्या मध्य धारेवर नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरामध्ये सोमवार दि.५ फेब्रुवारी रोजी कलशारोहन व श्री कालभैरवनाथांच्या मूर्तीची वेदमंत्राच्या जयघोषात गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 
यावेळी श्री क्षेत्र बहिरवाडीचा परिसर "नाथांच्या नावाने चांगभल" च्या जयघोषाने दुमदुमला होता. श्री क्षेत्र बहिरवाडी येथे कालभैरवनाथांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त त्रिदिनात्मक कार्यक्रमाचे व शिवलीलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गुरुवर्य भास्करगिरी महाराज समवेत महंत चंद्रशेखर भारती महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे, विठ्ठलराव लंघे पाटील उपस्थित होते. यावेळी त्रिदिनात्मक कार्यक्रमाची सांगता गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.भगवान शंकराचा अवतार असलेले श्री कालभैरवनाथ यांचा पदस्पर्श येथे झाल्याने हे क्षेत्र अधिकच जागृत असे बनले असल्याचे त्यांनी सांगितले.या क्षेत्राची महती दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगून त्यांनी भगवंताबद्दल असलेला भक्तिभाव हा शेवटच्या श्वासापर्यंत जपला पाहिजे कारण भगवंत भक्तीच मनुष्य जीवाला तारु शकते. त्यामुळे संत संगतीची कास धरा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. यावेळी उपस्थित संत महंतांचे संतपूजन व मंदिर जीर्णोद्धारासाठी योगदान देणाऱ्यांचा यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.