Breaking News

लिंबाचे विक्रमी उत्पादन;बाजारभाव कोसळला


श्रीगोंदा/प्रतिनिधी/- तालुक्यात चालू हंगामात चांगला पाऊस झाल्याने एकीकडे लिंबाच्या बागा बहरून लिंबाचे विक्रमी उत्पन झाले. तर दुसरीकडे लिंबाला मिळणारे कमी भावामुळे बाजारभाव कोसळला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे.
राज्यात लिंबू उत्पादनात तालुक्याचा मोठा वाटा असून,लिंबू या पिकापासून शेतकऱ्यांना रोख स्वरुपात त्वरित रक्कम मिळत असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या छोट्या मोठ्या गरजा लिंबू विक्रीतून शेतकरी भागवितात. आज लिंबू तोडणी, प्रतवारी करण्यासाठी लागणारा मजुरांचा पगार व मार्केटला आणण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च ही निघत नसल्याने लिंबू बागायतदार शेतकरी आर्थिक टंचाईचा सामना करताना दिसत आहे. 

एरवी लिंबू बागायतदार हा थोडासा आर्थिक सुबत्ता असलेला मानला जाई. परंतु बाजारभाव पडल्याने लिंबू बागायतदार शेतकरी व लिंबू विक्री करणारे छोटे व्यापारी सध्या आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बाजारपेठेवर त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. गेल्या वर्षी तालुक्यात अत्यल्प पडलेल्या पावसामुळे लिंबू बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी टँकरने पाणी घालून बागा जगविल्या. लिंबू बागा जगविण्यासाठी अक्षरश आपल्या कङील सर्व काही पणाला लावले होते. अशा परिस्थितीत बाजारभाव कमी झाल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. गेल्या वर्षी या काळात लिंबाला प्रति किलो १५ /- ते २० /- रूपये बाजार होता आज माञ ६ /- ते ७/- रूपये बाजार आहे. एवढा मोठा बाजार भावाचा फरक या आधी कोणत्याही वर्षी झाला नव्हता. त्यामुळे सरकार बदलल्याने परिणाम झाला असल्याची चर्चा शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात चालू आहे. अतिपावसाने कोळशी रोगाचा परीणाम झालेचे कृषी आधिकारी सांगत आहेत. परंतु कोळशी रोग रोखण्यासाठी ठोस पर्याय अद्यापही उपलब्ध नाही. आता असलेल्या बाजार भावात लिंबू काढणाऱ्या मजुराचे पैसे सुध्दा होत नाहीत. वाहतूक आणि लिंबू बागाईतदार व शेतकऱ्यांचे कुटुंब कसे जगणार यांचा सरकारने विचार करावा.