Breaking News

सख्खा भाऊ ठरला पक्का वैरी ः आरोपी गजाआड


महात्मा फुले कृषि विद्यापीठालगतच्या धर्माडी विश्रामगृह येथे 4 महिन्यांपूर्वी सापडलेल्या मयत किरण शेलारचे मारेकरी शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. किरण शेलारचा खून त्याचा सख्खा भाऊ अमोल शेलारने अनैतिक संबंधातून केल्याचे उघडकीस आले आहे. तोंड दगडाने ठेचलेला व अर्धनग्न अवस्थेत एका तरूणाचा मृतदेह पोलिसांना कृषि विद्यापीठातील धर्माडी विश्रामगृहाच्या पायथ्याशी दि. 23 ऑक्टोबर रोजी आढळून आला होता. दरम्यान पोलिस प्रशासनाने तपास सुरू केल्यानंतर सदरचा मृतदेह किरण रावसाहेब शेलार (30वर्ष) रा. पिंप्री अवघड ता. राहुरी याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांना पुर्वीपासूनच मयत किरण शेलारचा भाऊ अमोल रावसाहेब शेलार यावर शंका होती. त्यानुसार घटना घडल्यापासून पोलिस प्रशासन अमोल शेलार याच्या हालचालीकडे बारकाईने लक्ष देऊन होते. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनेचा छडा लावण्यासाठी सायबर सेलचे सहकार्य घेतले. सायबर सेलचे पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतल्यानंतर तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे मयत किरण शेलारचा मारेकरी त्याचा सख्या भाऊ अमोल शेलार असल्याची शंका व्यक्त केली. श्रीरामपूर विभागाचे उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, सुनिल पवार, पोलिस हवालदार फुरकान शेख, प्रमोद जाधव, सचिन धनाड, बंडू बहिर, गुलाब मोरे, नवनाथ वाघमोडे, भिसे व चालक दातीर यांनी संशयित अमोल शेलार याचा शोध घेतला. अमोल शेलार रा. तेलगाव ता. मुरबाड जि. ठाणे यास त्याच्या राहत्या घरातून तांत्रिक विश्‍लेषणाच्या संशयातून चौकशी केली. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखविताच अमोल शेलारने घटनेचा उलगडा पोलिसांपुढे केला. मयत किरण शेलारची सासूशी अमोल शेलारचे अनैतिक संबंध होते अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली. पोलिसांचे दोन पथके दुसर्‍या आरोपीचा शोध घेत आहेत.