Breaking News

मंदिर परिसरात वाहतुकीची कोंडी, भाविकांची दमछाक

कुळधरण । किरण जगताप  :- अष्टविनायकापैकी एक असलेल्या कर्जत तालुक्यातील सिध्दटेक येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची वाहने पार्क करण्यासाठी वाहनतळाचे काम करण्यात आले. मात्र नियोजनाच्या अभावामुळे वाहनतळावर वाहने पार्क केली जात नाहीत. मंदिरासमोरच रस्त्यावर वाहने पार्क केली असल्याने मंदीर परिसरात वाहतुकीची कोंडी नित्याची झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाविकांची दमछाक होत आहे.


वाहतुकीच्या कोंडीमुळे राज्याच्या विविध भागातून अष्टविनायक दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना रस्त्यातच अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे भाविकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. सिध्दटेकच्या विकासासाठी अद्यापपर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केलेला आहे. मात्र भाविकांची गैरसोय मात्र कमी होताना दिसत नाही.

पर्यटन विकास योजनेअंतर्गत वाहनतळ कामासाठी लाखो रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला.कार पार्किंगसाठी 24 लाख 48 हजार, बस पार्किंगसाठी 24 लाख 71 हजार तर रोलिंग काम व संरक्षक भिंत बांधकामासाठी 23 लाख 65 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. त्यानुसार कामही पूर्ण करण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या व्यवस्थापनाबाबत महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत यांच्यातील समन्वय व निर्णयाच्या अभावामुळे वाहनतळाचा वापर नियोजनबद्धपणे होवु शकलेला नाही. वाहनतळाचे टेंडर व त्यानंतरची अंमलबजावणी या बाबतच्या संदिग्धतेमुळे भाविकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीने सार्वजनिक घाटाच्या बांधकामासाठीही निधी वर्ग केला. त्यानुसार पुलानजिक घाटाचे बांधकामही पूर्ण करण्यात आले. मात्र अद्यापही त्या घाटांचा वापर केला जात नाही.शासन व ग्रामपंचायत यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गणेशभक्तांना विघ्नहर्त्याला या प्रश्‍नावर साकडे घालण्याची वेळ आली आहे.