महाईसेवा सेतू केंद्रांकडून ग्राहकांची आर्थिक पिळवणूक सेतू केंद्रांना तहसीलदारांचे अभय!
शहरातील सेतू केंद्रामध्ये नागरिकांची नेहमीच गर्दी असते. विविध प्रकारच्या दाखल्यांचे प्रस्ताव सेतू केंद्रामार्फत प्रशासनाकडे सादर केले जातात. सदर प्रस्ताव दाखल करताना सेतू केंद्रांकडून जनतेची खुलेआमपणे आर्थिक लूट केली जात आहे. प्रशासन मात्र या अनधिकृत शुल्क आकारणी करणाऱ्या सेतू केंद्रावर कारवाई न करता त्यांना अभय देत आहे. येथील एकही सेतुकेंद्रामध्ये दरपत्रक लावण्यात आलेले नाही. प्रस्ताव दाखल केल्यानंतर ग्राहकांना शुल्क प्रधान पावतीही दिली जात नसल्याचे दिसून आले आहे. ग्राहकांना जी पावती दिली जाते, त्यावर ग्राहकाचे नाव, देयक दिनांक, दाखल्याचा प्रकार इतकाच उल्लेख असतो. सदर दाखल्यासाठी किती शुल्क आकारणी केली, त्याचा उल्लेख त्या पावतीवर नसतो. म्हणजेच सदर दाखल्यासाठी नेमके किती शुल्क आहे, हे लोकांना सेतू केंद्रांकडून समजूच दिले जात नाही. तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सर्वच महा ई सेवा केंद्रामध्ये ग्राहकांकडून नियमबाह्य पद्धतीने शुल्क आकारणी करून लूट होत आहे. मात्र असे असताना प्रशासन संबंधितांवर कारवाई का करीत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासन व सेतू केंद्रचालकाचे आर्थिक संबंध तर नाहीत ना, अशी शंका उपस्थित होत आहे. दरम्यान, यासंदर्भात तहसील कार्यालयात संपर्क साधला असता कुठलीही माहिती मिळू शकली नाही.
