पालकमंत्री शिंदे व खा. दिलीप गांधीच्या राजीनाम्यांची मागणी
श्रीपाद छिंदमने शिवजयंतीच्या पार्श्वभूमिवर शिवजयंती व छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारल्याने त्याचे पाठीराखे खासदार दिलीप गांधी व भाजपाचे जबाबदार नेते म्हणून पालकमंत्री ना.राम शिंदे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामे द्यावेत. तसेच पाथर्डी नगर पालिकेच्या मुख्याधिकारी वसुधा कुरणावळ यांनी शिवजयंतीला अनधिकृतरित्या दांडी मारल्याबद्दल त्यांची पाथर्डीतून हकालपट्टी करण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. म्हणून शनिवार,२४ फेब्रुवारीच्या सकाळी पाटील व डांगे यांनी बैठा सत्याग्रह सुरु केला आहे. आतापर्यंत त्यांना विविध सामाजिक संघटना, गावोगावचे सरपंच, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. ऋषीराज टकले, उपसभापती विष्णूपंत अकोलकर, मनसेचे तालुकाध्यक्ष नामदेव मुखेकर, माजी नगरसेवक रामनाथ बंग, सामाजिक कार्यकर्ते भास्कर आव्हाड, रासपचे वसंत घोगरे, राष्ट्रवादीचे दिगंबर गाडे, चाँद मनियार पंडीत देवढे, महेश बोरूडे, आरपीआयचे माजी तालुकाध्यक्ष अंबादास आरोळे, शेवगाव शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भरत लोहकरे, कॉम्रेड रामभाऊ दातीर, मराठा सेवा संघाचे आकाश आढाव यांनी आंदोलनाला लेखी पाठिंबा दिला. दरम्यान स्वाभिमान पक्षाचे नितेश राणे यांनी आंदोलकांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून पाठिंबा व्यक्त केला.
भिमा कोरेगावच्या घटनेनंतर प्रत्येक घटनेला जातीयवादाचा रंग देण्याचे काम काही प्रतिगामी मंडळींनी सुरु केले आहे. तसाच प्रकार श्रीपाद छिंदम याने शिवरायांबद्दल अपशब्द काढून त्याचा पक्ष व सरकार जातीवादी असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे पालकमंत्री ना.राम शिंदे व खासदार दिलीप गांधी यांनी नैतिकतेची जबाबदारी स्विकारून राजीनामे द्यावेत. आणि सकल शिवभक्तांची माफी मागावी. अन्यथा २०१९च्या निवडणूकांत सकल शिवभक्त त्यांची ताकद दाखवून देतील.
