Breaking News

दखल - शिवसैनिकांचा रोष!

नगरचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवजयंतीच्या तीन दिवस अगोदर शिवाजी महाराजांविषयी अनुद्गार काढले. शिवजयंतीविषयी ही त्यांनी अवमानकारक भाषा वापरली. त्यानंतर छिंदम याची उपमहापौरपदावरून हकालपट्टी करण्यात आली असली आणि त्याच्याविरोधात गुन्हे दाखल झाले असले, तरी शिवसैनिकांत नाराजी कायम आहे. छिंदमचा भाजपशी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघांशी काहीही संबंध नाही, असं सांगण्याचा प्रयत्न झाला असला, तरी त्यामुळं भाजपविषयीचा राग आणखीच वाढत गेला. इतकी वर्षे ज्याला पदं दिली, त्याचा आता मात्र पक्षाशी संबंध नाही, असं सांगण्याचा भाजप प्रयत्न करतो आहे.

शिवसेनेनं त्यांच्या मुखपत्रातून भाजप व छिंदमवर टीका केली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी गडावर संतप्त शिवसैनिकांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना रोखलं. इतकंच नाही, तर ‘भाजप सरकार हाय हाय’च्या घोषणा दिल्या. खरं तर शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. शिवजयंतीला शिवसैनिक सातत्यानं गडावर जात असतात. शासकीय शिवजयंती आणि तिथीनुसारची शिवजयंती अशा दोन्ही वेळा शिवसैनिक गडावर जात असतात. त्यांचं शिवाजी महाराजांवरचं प्रेम बेगडी नसतं. त्यामुळं आज सकाळी शिवसैनिक जेव्हा गडावर जाण्यास निघाले, तेव्हा त्यांना पोलिसांनी रोखलं. त्यामुळं शिवसैनिक संतप्त होणं स्वाभाविक होतं. व्हीआयपी संस्कृती बंद करण्याची मागणी या वेळी शिवसैनिकांनी केली आहे. प्रवेश पास असलेल्या शिवप्रेमींनाच गडावर सोडण्यात येत असल्यानं हजारो शिवभक्तांना गडाच्या पायथ्यावरूनच माघारी जावं लागलं. त्यामुळं या शिवभक्तांना राग अनावरण झाल्यानं त्यांनी विनोद तावडे व पंकजा मुंडे या मंत्र्यांना रोखलं. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणार्‍या शिवरायांचा ज्या ठिकाणी जन्म झाला, त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचं बालपण गेलं. राज्याच्या कानाकोपर्‍यातून शिवनेरीवर शिवप्रेमींनी गर्दी केली आहे; मात्र शासकीय कार्यक्रम असल्यामुळं शिवसैनिकांना शिवनेरी गडाच्या पायथ्याशी पोलिसांनी अडवून धरलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन केलं. तावडे आणि मुंडे परत जात असताना संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी त्यांना अडवलं. मुंडे आणि तावडेंना जाब विचारला. या वेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री हाय हाय, भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तामध्ये मंत्र्यांनी कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेतला. शिवजयंतीच्या दिवशी शिवसैनिकांना रोखून गालबोट लावण्याचा प्रयत्न होता; परंतु केवळ विरोधी घोषणांवर निभावलं.