Breaking News

रोटोमॅकचा 3 हजार 695 कोटींचा कर्जघोटाळा

कानपूर : पंजाब नॅशनल बँक घोटाळ ताजा असतांनाच पुन्हा एकदा रोटोमॅक या कंपनीच्या मालकांने तब्बल 3 हजार 695 कोटी रूपयांचा बँक घोटाळा केल्याचे समोर आले आहे. सुरूवातीला वाटणारा 800 कोटी रूपयांचा घोटाळा, सीबीआयच्या तपासानंतर 3 हजार 695 कोटींपर्यंत पोहचला आहे. रोटोमॅकने 7 बँकांकडून 2 हजार 919 कोटी रुपये इतके कर्ज घेतले होते आणि सध्या थकबाकीची रक्कम 3 हजार 695 कोटींवर पोहोचली आहे, असे या चौकशीतून तसेच कागदपत्रांच्या छाननीतून समोर आल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 


सीबीआयने रोटोमॅकविरोधात गुन्हा दाखल केला असून छापेमारी सुरु केली आहे. बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. कानपूरमध्ये तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत सोमवारी सकाळी ‘सीबीआय’ने विक्रम कोठारीला ताब्यात घेतले. रविवारी रात्री कोठारी विरोधात तक्रार दाखल झाली होती. सोमवारी सकाळी 4 वाजता सीबीआयच्या टीमने कानपुरमध्ये कोठारीच्या 3 ठिकाणांवर छापेमारी केली. 800 कोटींचे कर्ज चुकविण्याच्या प्रकरणात बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीवरून ही छापेमारी करण्यात आली होती. मात्र सीबीआयच्या तपासात 3 हजार 695 कोटी रूपयांची बँकाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सीबीआय टीमने विक्रम कोठारीची पत्नी आणि मुलांकडे चौकशी केली. कानपुरच्या टिळक नगरमधील ‘संतुष्टी’, रोटोमॅक ऑफिस आणि एका ठिकाणावर सीबीआयने छापा मारला. 
या घोटाळ्यांच्या आरोपांनंतर कंपनीचे मालक विक्रम कोठारी देशातून फरार झाल्याचं वृत्त होतं. मात्र रविवारी एका लग्न समारंभात ते दिसून आले. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्यासह दिग्गज राजकीय नेते आणि उद्योगपती उपस्थित होते. रोटोमॅकचे मालक विक्रम कोठारी यांनी सरकारी बँकांकडून जवळपास 2 हजार 919 कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. मात्र अजूनही ते भरलेलं नाही, त्यामुळे व्याज धरून हे कर्ज तब्बल 3 हजार 695 कोटी रूपयांवर पोहचले आहे. कानपूरच्या टिळक नगरमध्ये विक्रम कोठारीचा आलिशान बंगला आहे, मात्र ते सध्या बंगल्यात राहत नाहीत. तर पनकी दादा नगर भागात कारखाना आहे, जो बंद आहे. कानपूरच्या माल रोडच्या सिटी सेंटरमध्ये रोटोमॅकचं कार्यालय आहे, तेही सध्या बंद अवस्थेत आहे. रोटोमॅकला युनियन बँकेने 485 कोटी रूपयांचे कर्ज दिलेले आहे आणि हे कर्ज वसूल करण्यासाठी कोठारींची जी संपत्ती बँकेकडे गहाण ठेवलेली आहे, ती विकली जाणार आहे, असे युनियन बँकेचे मॅनेजर पीके अवस्थी यांनी सांगितले.