Breaking News

अग्रलेख - साहित्य संमेलनात घुमला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गजर


अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि वाद हे नवीन समीकरण नाही. मात्र यंदा 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एका वेगळया धाटणीचे ठरले. बडोदा ही अर्थात छत्रपती सयाजी महाराज यांची कर्मभूमी. उदार, लोककल्याणकारी राजा म्हणून परिचीत असलेल्या या भूमीत राजा तू चुकत आहेस, असे खडे बोल सुनावण्याची धमक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी दाखविली. वास्तविक लक्ष्मीकांत देशमुख हे नोकरशहा. ते जरी नोकरशहा असले, तरी त्यांनी आपल्या लेखणीद्ारे मुक्तपणे लिखाण केले आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी संशय नव्हताच. मात्र देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कोणतीही कृत्रिमता न दाखवता, वर्तमानाचे अनेक पैलू त्यांनी रोखठोक मांडले. आजची समाजव्यवस्था जशी झपाटयाने बदलत चालली आहे, तसाच अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा देखील संकोच करण्यासाठी शासकीय स्तरावरून प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे, पुरस्कार वापसी वर देखील त्यांनी आपले मत व्यक्त करत, राजा तू चुकत आहेस, असे सांगत राज्यसरकारला खडेबोल सुनावले. एकविसाव्या शतकांत वावरत असतांना, तुम्ही देशांतील प्रत्येक व्यक्तीला मुक्तपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगता आले पाहिजे, तो त्याचा अधिकार आहे. मात्र देशातील उन्मादी धार्मिक वातावरणाला रोखण्याऐवजी, राजकीय लोकप्रतिनिधी यांचे पुरक वक्तव्ये या उन्मादाला खतपाणीच घालत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय वक्तव्यामुळे सामाजिक शांतता लयाला चालली आहे. रोज देशात कुठेतरी दंगा, अराजकता, यासारखे प्रकार घडत आहे. या देशात विविध जाती पातीचे रोज गुण्या गोविंदाने राहत असतांना, या शांततेला अशांततेत परावर्तीत करण्यात येत आहे, ते केवळ आपली राजकीय पोळी भाजण्यासाठीच. या सर्व उन्मादांचे सर्व प्रतिबिंब देशमूख यांनी आपल्या भाषणात मांडले. वास्तविक देशमुख हे शांत आणि संयमी स्वभावाचे आणि मुख्यता सनदी अधिकारी. त्यामुळे आजच्या राजकीय व्यवस्थेवर देशमुख भाष्य करणार नाही, असा अनेक साहित्यिकांचा होरा होता. मात्र सर्वांचा हा कयास धुळीत मिळवित देशमुख यांनी आपली समाजव्यवस्थेशी असलेली नाळ कायम ठेवत राजकीय व्यवस्थेवर कोरडे ओढले. देशमुख आता सेवानिवृत्त असल्यामुळे आणि पुढे राजकारणांत येण्याचे कोणतेही मनसुबे नसल्यामुळे देशमुख यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गजर साहित्य संमेलनात घुमवला नसता, तरच नवल. राजा तु चुकत आहे. असे सत्ताधार्‍यांना खडे बोल सुनावतांना, देशमुख यांचा रोख हा सत्ताधार्‍यांबरोबरच सर्वच राजकीय पक्षांकडे आणि व्यवस्थेकडे देखील होता. देशभरात बेरोजगारीची संख्या मोठया वाढत आहे. तरूण वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी मोर्च काढत आहे. तर आयटी क्षेत्रात अद्यापही मंदीचे वातावरण आहे. सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. त्याचे लोण साहित्यांतून पाहिजे, तसे उमटत नाही. मात्र त्याला काही साहित्यक अपवाद देखील आहेत. अर्थात आधुनिक- सुसंस्कृत जगात शासन हे कलावंतापुढे नम्र असायला हवे. मात्र कलावंताचा वापर आपली सोयीचे ध्येय धोरणे राबवण्याकरता सत्ताधारी करतांना दिसून येतात. तर काही कलांवत देखील आपली सद्सद्विवेक बुध्दी शासनाच्या दावणीला बांधून कोणत्यातरी पुरस्काराच्या हव्यासासाठी, अथवा शासकीय योजनांच्या लाभासाठी चुकीचे लिखाण करतात. तर काही कलांवत मंडळी निडरपणे सत्ताधार्‍यांच्या ध्येधोरणांवर हल्ला चढवत पुरस्कार परत करण्याची धमक दाखवतात. त्यामुळे कलांवताने आपल्या कलेशी प्रामाणिक असायला हवे, तरच सत्ताधार्‍यांना ताळयावर आणण्यासाठी समाजाला ते एक दिशा देवू शकतात.