Breaking News

अग्रलेख - बेताल वक्तव्यांनी गाठली परिसीमा


बेताल वक्तव्याने कधी नव्हे ते आता उंच टोक गाठले असून त्याला लगाम घालण्याची गरज निर्माण झाली आहे. बेताल वक्तव्य करून आपल्या अपरिपक्व बुध्दीमत्तेचे दर्शन घडवणारे थोडेथोडके नसून जास्तच आहे. भाजपाचे सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यापासून तर या बुवा-बाबांना अच्छे दिन आले. त्यामुळेच त्यांचे बेताल वक्तव्ये सहज खपत आहे, शिवाय कारवाईचा कसलाही बडगा नाही. म्हणूनच दोन- चार दिवस झाले की एक तरी बाबा-साध्वी महाराज बरळणारच. बाबा-बुवा यांचे बेताल वक्तव्य कमी झाली की काय म्हणून त्यात भाजपच्या आमदार-खासदार आणि मंत्रीमोहदयांनी उडी मारल्याचे दिसून येते. भाजपचे खासदार विनय कटियार यांनी मुस्लिमांनी भारतात राहू नये, असे वक्तव्य करून आपल्या अकलेचे तारे तोडले होते. काही दिवसांपूर्वीच कौशल्य राज्यमंत्री अनंत हेगडे यांनी संविधान बदलण्यासाठी आम्ही सत्तेत आल्याचे वादग्रस्त वक्तव्य करत आपल्या वैचारिक अपरिपक्वतेचा प्रत्यय दिला होता. वास्तविक ही यादी न संपणारी असून, दोन-तीन दिवस जात नाही, तोच राष्ट्रीय, अथवा राज्यस्तरावरील, बुवा, महारांज, आमदार-खासंदार वादग्रस्त वक्तव्य करून सामाजिक शांतता भंग करतांना दिसून येत आहे. समाजाला आराध्य असलेल्या एखाद्या महापुरूषाचे नाव घेतले तर रातोरात प्रसिध्दीचा झोत अंगावर पडतो आणि विचारवंत म्हणून मान्यता पावल्याचे समाधान मिरविता येते. अशा भ्रमात वावरणार्‍या विचारवंतांची पिलावळ आज भारतात हैदोस घालू लागली आहे. अशा पिलावळींमुळेच खरे तर देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होतो आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, समाजाने ज्यांना त्यांच्या विशिष्ट क्षेत्रातील कर्तृत्वामुळे डोक्यावर घेतले, मानसन्मान दिला अशा मंडळींनीही विचारवंत बनण्याच्या नादात अक्षम्य चूक करावी खरे तर नसते झोंगाट ओढवून घेण्याची बुध्दी सुचणे म्हणजे विनाशकाल ओढवून घेण्यासारखे आहे ही साधी बाब या कथित विचारवंतांना समजू नये हाच त्यांच्या विचारवंत असण्याचा मोठा पुरावा ठरू शकतो. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास निर्माण केला त्या महापुरूषांमध्ये तुलना करण्याचे धाडस दाखवून या मंडळींना नेमके काय साध्य करायचे आहे? खरे तर प्रत्येक महापुरूष त्यांच्या जागेवर श्रेष्ठ आहेत. त्यांनी कधीही जात धर्म पाळले नाहीत. मग अमुक एक महापुरूष अमुक एका जाती धर्माचा असता तर त्याला अधिक सन्मान मिळाला असता असे वक्तव्य करण्याचा गाढवपणा हे विचारवंत का करतात हाच खरा प्रश्‍न आहे.
एकविसाव्या शतकातील विचारवंतांना उपजत म्हणावी अशी स्वतःची विचारधारा उरली आहे का? असा प्रश्‍न पडावा इतपत या विचारवंतांची पातळी घसरू लागल्याने समाज दिशाहीन होत आहे. सैरभेर झाला आहे आणि याच चंचल अस्वस्थतेतून सामाजिक एकोपा धुळीस मिळाला आहे. म्हणूनच आजच्या बिघडलेल्या समाज आरोग्याला कथित विचारावंतांना जबाबदार ठरविण्यास आम्हाला यत्किंचितही भिती वाटत नाही. आजचे विचारवंत म्हणजे कुठल्या न कुठल्या विचारधारेचे बटीक असल्यासारखे बरळू लागले आहेत. कुणी पुरोगामी, कुणी प्रतिगामी कुणी कर्मठ धर्मवादी या ठेल्यांवर गुलाम असल्याप्रमाणे वक्तव्ये करून विचारवंत असल्याचा शिक्कामोर्तब करू लागले आहेत. खरे तर विचारवंतांला स्वतःचा विचार असतो. तो कुणाच्या दावणीला बांधल्याप्रमाणे बेताल गरळ ओकत नाही. प्रसंगी अवघा समाज अंगावर घेण्याची उर्जा विचारवंतांच्या तत्वज्ञानात समावलेली असते तो खरा जातीवंत विचारवंत. मात्र विचारमंथन करण्याची ताकद नसलेले, समाजाला कोणतीही दिशा देण्याचे भान नसलेले अनेक कर्मट, वादग्रस्त व्यक्ती बेताल वक्तव्य करून समाजाला सैरभैर करू इच्छितात, त्यांचा कावा ओळखून त्यांना आवर घालण्याची गरज आहे.