Breaking News

तारकर्ली येथील उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली

सिंधुदुर्ग, दि. 01, फेब्रुवारी - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तारकर्ली पर्यटन केंद्र व स्कुबा डायव्हिंग सेंटर येथील 11 कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केल्यानंतर डॉ. जितेंद्र केरकर यांच्या नेतृत्वाखाली या 11 कामगारांच्या वतीने तारकर्ली येथील पर्यटन केंद्राच्या गेटसमोर 26 जानेवारी पासून बेमुदत उपोषण आंदोलन छेडण्यात आले. यात स्नेहा केरकर, अजित गोसावी, देवेंद्र मयेकर,धोंडी केळुसकर, जार्ज फर्नांडिस, कुणाल बापर्डेकर, संजीव केळुसकर, सागर करंगुटकर, नंदू जोशी, महेश सावंत, अक्षय भगत, धीरज भगत यांचा सहभाग आहे. डॉ जितेंद्र केरकर सह काही ग्रामस्थांनी उपोषणाला साथ दिली आहे. 


उपोषणकर्त्यांच्या मागण्यांपैकी दोन मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यापैकी कामगारांचे थकीत वेतन उद्यापर्यंत जमा होणार आहे. मात्र सर्वच्या सर्व 11 कामगारांना पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करून पर्यटन खात्याच्या अधिकार्‍यांनी फक्त 7 कामगारांना पुन्हा सेवेत घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार कायम ठेवला. उपोषणकर्त्यांवर पर्यटन खात्याकडून गुन्हे दाखल करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप भाई मांजरेकर यांनी केला आहे. 
या सर्वाचा निषेध म्हणून काल आंदोलनकर्त्यांनी कांबळे, माने, चव्हाण यांच्या नावाने एमटीडीसीच्या प्रवेशद्वारासमोर पिंडदान घालून अनोखे आंदोलन छेडले. उपोषणाच्या आज पाचव्या दिवशी उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून उपोषणकर्त्यांना साथ देण्यासाठी उपोषण सुरू ठेवलेल्या डॉ जितेंद्र केरकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सायंकाळी 108 रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले.