Breaking News

शेतमालाला योग्य भाव मिळाला तर आत्महत्या थांबतील : सहकारमंत्री सुभाष देशमुख

ठाणे : शेतकरी मेहनतीने घाम गाळून शेती करतो, त्याच्या मालाला योग्य भाव मिळाला, चार पैसे त्याला मिळाले तर, आत्महत्या करायची वेळ त्याच्यावर येणार नाही. आठवडा बाजारसारख्या संकल्पनेतून मधले दलाल संपुष्टात येऊन शेतकर्‍याला त्याचा माल थेट ग्राहकांना विकता आला तर, नक्कीच शेतक-यांच्या आत्महत्या थांबतील, असा विश्‍वास राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी ठाण्यात व्यक्त केला. 


शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात सुरू करण्यात आलेल्या आठवडा बाजारच्या उदघाटनासाठी सहकारमंत्री आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आठवडा बाजार संकल्पना चांगली असून ग्राहकांना चांगला माल कमी किमतीत मिळू शकेल, तसेच शेतक-यांचा माल संपला तर, तो देखील खुश होईल. शेतकरयाला मदत म्हणजे त्याच्या मेहनतीचा सन्मान करा, त्याला योग्य तो मोबदला द्या म्हणजे तो देखील सन्मानाने जगेल, असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले. ठाण्यातील हा बारावा आठवडा बाजार असून शेतकरी व ग्राहकांच्या सोयीसाठी आठवडा बाजार सोयीचा आहे, जास्तीत जास्त लोकांनी आठवडा बाजारचा फायदा घ्यावा, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी केले.