Breaking News

कर्लीतील वाळू उत्खननाबाबत दिशाभूल

सिंधुदुर्गनगरी, - कर्ली नदीत वाळू उत्खननाबाबत गावातील काही ठराविक माणसे गावातील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याना अशास्त्रीय आणि चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करत आहेत. वाळू उत्खननामुळे गाव खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या घरांना धोका आहे, अशी भिती दाखवून दहशत पसरवित आहेत. वाळूच्या टेकड्या ओहोटीवेळी तरंगायची. त्याऐवजी आता वाळूच्या टेकड्या ओहोटीवेळी पाण्याबाहेर दिसतात, याची आपण संबंधित खात्यातील तज्ज्ञ मांडली आणि अधिकार्‍यांनी पाहणी करून ग्रामस्थांच्या मनातील गैरसमज आणि भीती दूर करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे परुळेबाजार माजी सरपंच प्राजक्ता चिपकर यांनी निवेदनाद्वारे दिली आहे. 


सध्या पाण्याची खोली कमी झाली असुन सूर्यकिरणे पाण्यातून थेट जमिनीवर पोहचत असल्यामुळे पाण्याचे तापमान वाढून मत्स्यबीज नष्ट होत आहे. कर्ली-देवबाग फेरीबोट सुरु केल्यास देवबागला वारंवार होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. शासनाला यातून मोठा महसूल मिळेल. पर्यटक आकर्षित होतील. कुडाळ, वेंगुर्ले, गोवा येथून मालवणला येण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल, असे त्यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.
कर्ली जेटी येथे प्रचंड वाळू साठून तेथे ओहोटीवेळी प्रवासी होड्या लागत नाहीत. त्याचा परिणाम प्रवासी आणि शालेय विद्यार्थी यांना पाण्यात भिजून वाळूच्या टेकड्या ओलांडून करावा लागत आहे. खाडीतील गाळ काढला, तर तेथे साहसी जलक्रीडा प्रकार, पर्यटन निवास यामार्फत स्थानिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पर्यटन विकास झाल्यास ग्रा.पं.चे उत्पन्नही वाढेल. त्यामुळे गावात सोयीसुविधा पुरविणे शक्य होईल, असेही या निवेदनात चिपकर यांनी म्हटले आहे.