Breaking News

तिहेरी खुनप्रकरणी दोन जण ताब्यात


पुणे - पुणे शहराच्या मध्यवस्तीतील सोमवार पेठ भागातील नागझरी नाल्यामध्ये शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास तीन मृतदेह आढळून आले. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. या तिहेरी खुनाचा पोलिसांनी तपास केला असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून तिसरा संशयित आरोपी फरार आहे. कचरा गोळा करण्यार्‍या दोन गटातील वादातून तिघांचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.बाप्या उर्फ रवींद्र जगन सोनावणे, विक्रम दिपक सिंग परदेशी आणि मुन्ना भंगारवाला अशी या संशयितांची नावे आहेत. त्यापैकी मुन्ना भंगारवाला फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सध्या ताब्यात असलेले आरोपी व्हाइटनर आणि गांजाच्या नशेत असल्यामुळे त्यांनी अजूनही गुन्ह्याची कबुली दिली नाही. तरीही त्यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत.ही कामगिरी प्रभारी आयुक्त संजीवकुमार सिंघल, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (गुन्हे) पंकज डहाणे, सहायक पोलिस आयुक्त(गुन्हे) समीर शेख, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, सीताराम मोरे, सतीश निकम, बाळकृष्ण अंबुरे आणि इतरांनी केली.घटनेबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) समीर शेख यांनी सांगितले की, तीन संशयितांची नावे निष्पन्न झाले असून त्यापैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. अजून ते नशेत असून कचरा गोळा करणार्‍या दोन गटात झालेल्या वादातून हा प्रकार घडला असावा असे समीर शेख यांनी सांगितले.