Breaking News

विकासाच्या मुद्द्यावर अर्ध्यारात्री आवाज द्या : काळे


तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरिता राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत घेऊन जा. सर्वांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न करा. कोणतीही अडचण, प्रश्न असेल तर निःसंकोचपणे सांगा. विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि या मुद्द्यावर अर्ध्यारात्री आवाज द्या, असे आवाहन असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे विविध विकास कामांच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

कोळगावथडी ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या १४ व्या वित्त आयोगातून विविध विकास कामांचा शुभारंभ नुकताच पार पडला. यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेव्हर ब्लॉक बसविणे, पाईप लाईन विस्तारीकरण करणे आदी विकासकामांचा समावेश आहे. याप्रसंगी काळे म्हणाले, कोळगाव थडीच्या ग्रामस्थांनी नेहमीच काळे कुटुंबावर भरभरून प्रेम केले आहे. माजी खा. स्व. कर्मवीर शंकरराव काळे यांनी नेहमीच येथील ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले आहे. त्यांचा वारसा माजी आ. अशोक काळे यांनी पुढे चालवला आहे. त्यांच्या कार्यकाळात कोळगावथडी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा व महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा खाली उतरावा, यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या माध्यमातून जवळपास ५२ लाखांच्या पाणी योजनेसाठी प्रस्ताव सादर करून पाठपुरावा केला होता. या योजनेचे काम काही दिवसांत सुरु होऊन कोळगाव थडी ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार असल्याचे समाधान आहे.

याप्रसंगी शरद पवार पतसंस्थेचे माजी संचालक गंगाधर चव्हाण, गेणुजी शिंदे, बाबुराव निंबाळकर, पुंजाजी राऊत, कोळगाव थडीच्या सरपंच शामल लुटे, उपसरपंच अप्पासाहेब जाधव, सदस्या संगिता निंबाळकर, विठ्ठल जगताप, माजी सरपंच शिवाजी निंबाळकर, गुलाबराव निंबाळकर, माधवराव जाधव, नानासाहेब पंडोरे, नंदकिशोर निंबाळकर, राजाराम निंबाळकर, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी निंबाळकर, दिनकर वाकचौरे, शामराव मेहेरखांब, भाऊसाहेब लुटे, विलास निंबाळकर, कैलास लुटे, हुसेन शेख आदींसह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी भानुदास दाभाडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अॅड. शपिक शेख यांनी केले. नंदकिशोर निंबाळकर यांनी आभार मानले.