Breaking News

के. के. रेंज प्रकरणी शरद पवारांना साकडे

राहुरी / ता. प्रतिनिधी :- राहुरीसह नगर व पारनेर तालुक्यातील ग्रामस्थांमध्ये के.के. रेंज प्रकरणामुळे खळबळ उडाली असुन के.के. रेंजचे भूत पिटाळून लावण्यासाठी जि.प. सदस्य शिवाजी गाडे यांनी राहुरीतुन पुढाकार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना साकडे घातले आहे.


के. के. रेंज प्रकरणी माजी खा. दादा शेळके, जि. प.सदस्य शिवाजी गाडे यांनी पुढाकार घेण्याचा निर्णय घेत जनजागृती सुरू केली असुन शिवाजी गाडे व कॉ. गंगाधर जाधव यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत के.के. रेंज संदर्भात निर्माण झालेले संकट दूर करण्याबाबतचे निवेदन सादर केले आहे. राहुरी व पारनेर भागातील शेतकर्‍यांनी यापूर्वीच मुळा धरण व विद्यापीठ निर्मितीसाठी आपल्या जमिनी देऊन मोठे योगदान दिलेले आहे. त्यातच पुन्हा के.के. रेंजकडून अधिग्रहण झाल्यास संबंधित भागातील शेतकरी व ग्रामस्थांवर मोठे संकट उभे राहणार आहे. त्यासाठी शरद पवार यांनी के. के. रेंजच्या संकटातून संबंधित गावांची सुटका करावी अशी मागणी शिवाजी गाडे, गंगाधर जाधव यांनी निवेदनातून केली आहे.