Breaking News

म्हसवंडी गाव पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण केंद्र


मा. महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंधारण कामासाठी राज्यात दिशादर्शक ठरलेले म्हसवंडी हे गाव आता सिनेअभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनचे प्रशिक्षण केंद्र झाल्याने तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. सत्यमेव जयते या सामाजिक संस्थेच्या वतीने मागील 3 वर्षांपासून पाणी अडवा, पाणी जिरवा या पर्यावरण व जलसंधारणाची चळवळ राबविली जात आहे. या अभियानाने देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होत आहे. यावर्षी पाणी फाऊंडेशन मध्ये 75 तालुक्यांचा सहभाग निश्‍चित झाला आहे. याची घोषणा नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमीर खान, किरण राव, उद्योजक मुकेश अंबानी, मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत झाली. या 75 तालुक्यातील कार्यकर्त्यांचे प्रशिक्षणासाठी संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी या गावाची केंद्र म्हणून निवड झाली आहे. म्हसवंडी हे गाव संगमनेरच्या पठार भागात असून या गावचे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पातील नाबार्ड बँक अनुदानातून मोठे काम केले आहे. कारखाना व फादर बाखर यांच्या वॉटर ऑरगनाईजेशन ट्रस्टच्या सहकार्यातून म्हसवंडी दुष्काळ दुर्गम ते पाणीदार गाव ठरले आहे. सत्यमेव जयते या संस्थेने या कामाची दखल घेवून कौतूक केले आहे. यामध्ये आमदार बाळासाहेब थोरात, कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, फादर रॉबर्ट डिकोस्टा, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, आदिवासी जनसेवक प्रा. बाबा खरात, दंडकारण्य अभियानाचे समन्वयक बाळासाहेब उंबरकर, शंकरराव ढमक, ज्ञाानदेव बोडखे, सुभाष इथापे, रविंद्र इथापे, शिवाजी बोडखे यांसह सर्वच ग्रामस्थांचा सहभाग आहे. कारखान्याने केलेल्या या जलसंधारणाच्या कामाला नाबार्डने मान्यता दिली आहे. याच धर्तीवर सत्यमेव जयतेने प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे.