Breaking News

बेशिस्तांवर ‘हायटेक’ कारवाई !


पुणे : ‘मृत्युचा महामार्ग’ बनलेल्या पुणे-मुंबई एक्सप्रेस वेची ही ओळख पुसून टाकण्यासाठी हायटेक होत महामार्ग पोलिसांकडून व्हॉट्स अप’ ग्रुपचा आधार घेतला जात आहे. रॅश ड्रायव्हिंग आणि नियमभंग करणार्‍या वाहनांचे नंबर टोल नाक्यावरील पथकांना व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून कळवून त्याद्वारे दंडात्मक कारवाईची शक्कल शोधून काढली आहे. विशेष म्हणजे ही नामी शक्कल अफलातून कामी आली असून अपघात आणि रॅश ड्रायव्हिंगचा टक्का निम्म्याने कमी झाला आहे. त्याशिवाय अवघ्या वर्षभरात नियम मोडणार्‍या सुमारे अडीच लाख जणांवर कारवाई करत पंधरा कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहनचालकांच्या दृष्टीने ‘गतिमान’ समजला जाणारा पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवे गेल्या काही वर्षांपासून ओव्हरस्पीड, रॅश ड्रायव्हिंग, लेनकटिंग आणि अन्य कारणांमुळे अक्षरश: ‘मृत्युचा महामार्ग’ बनला आहे. त्यातूनच अनेकांचा बळी गेला असून काही जखमी झाले आहेत. त्याची महामार्ग वाहतूक पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून या घटनांना लगाम घालण्यासाठी कारवाईचा धडाका लावला आहे. या महामार्गामुळे पुण्याहून मुंबईचा प्रवास अवघ्या दोन ते अडीच तासांमध्ये पूर्ण करणे शक्य झाले आहे.मात्र, वाहनचालकांकडून सर्रास होणार्‍या नियमभंगामुळे हा महामार्ग मृत्युचा सापळाच बनला आहे. या महामार्गावर सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी कार, ट्रक तसेच ओव्हरटेकिंग करण्यासाठी स्वतंत्र लेन तयार करण्यात आल्या आहेत. तसेच, रॅश ड्रायव्हिंग करण्यास मज्जाव करण्यात आला असून वाहनांच्या गतीवरही मर्यादा आणल्या आहेत. मात्र, हे वास्तव असतानाही वाहनचालकांकडून नियमांचा भंग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातूनच अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे.