Breaking News

अमेझॉनला गंडवणार्‍या चार कामगारांना अटक अ‍ॅमेझॉन व डिलिव्हरी डॉट कॉमला लाखोंचा घातला होता गंडा

ठाणे : अमेझॉनकडून ग्राहकांना येणारे पार्सल फोडून त्यात साबणाच्या वड्या भरणार्‍या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 57 मोबाईल, 3 लॅपटॉप असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून मुख्य आरोपी उमेश गुळवी, टेम्पो चालक हुसैन रफिकुद्दीन, अमेझॉन कंपनीचे माजी कर्मचारी संदीप सराफ, सचिन पटाळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ऑक्टोबर 2017 पासून ही टोळी अशा पद्धतीने काम करीत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. या चौघांनाही भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

भिवंडी तालुक्यातील दापोडा येथील डिलिव्हरी डॉट कॉम या कुरियर कंपनीच्या माध्यमातून अ‍ॅमेझॉन कंपनी ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवीत असते. अशावेळी ग्राहकांनी वस्तू स्वीकारण्यास नकार दिल्यास अथवा पत्ता न सापडल्यास अशा वस्तू डिलिव्हरी डॉट कॉम कंपनी सीलबंद करून पुन्हा माघारी अ‍ॅमेझॉन कंपनीकडे पाठवीत असे. परंतु मागील चार महिन्यात अ‍ॅमेझॉन कंपनीस मिळणार्‍या वस्तूंची गोळाबेरीज जमत नसल्याने त्यांनी डिलिव्हरी डॉट कॉम कंपनीकडे तक्रार केल्यावरून कुरियर कंपनीचे सुरक्षा अधिकारी मंगेश मोहिते यांनी नारपोली पोलीस ठाण्यात 24 लाख रुपयांच्या मालाचा परस्पर अपहार झाल्याची तक्रार दाखल केली. त्याचा तपास भिवंडी गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस नाईक राजेंद्र सांबरे, किशोर माने, अनिल पाटील, पोलीस शिपाई प्रमोद धाडवे, श्रीधर गुंडेकरी या पथकाने तपास सुरू केला. या चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी डिलिव्हरी डॉट कॉममधील कर्मचारी उमेश गुळवी, टेम्पो चालक हुसैन रफिकुद्दीन अ‍ॅमेझॉन कंपनीचे माजी कर्मचारी संदीप सराफ, सचिन पटाळे हे आपल्याकडील महागडे मोबाईल वंजारपट्टी नाका येथे विकण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळताच त्याठिकाणी सापळा रचून पोलीस पथकाने या चौघांच्या मुसक्या आवळल्या.

आरोपीच्या चौकशीतून पोलिसांना धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये अ‍ॅमेझॉन कंपनेच्या ज्या किमती वस्तू डिलिव्हरी डॉट कॉम कुरियर कंपनीकडे माघारी येत होत्या, त्या अमेझॉन कंपनीकडे पाठविण्याची जबाबदारी उमेश गुळवी याची असताना या वस्तूंच्या कार्टूनवरील सील ड्रायव्हरच्या मदतीने बाहेर परस्पर काढून त्यामधील किमती मोबाईल, लॅपटॉप हे बाजूला काढून रिकामे बॉक्स कार्टूनमध्ये ठेवून ते अ‍ॅमेझॉन कंपनीस दिले जात होते. या कार्टूनसोबत कार्टूनमधील वस्तूंची विगतवार यादी असायची. त्याबाबत या आरोपींशी संगनमत करून कोणतीही शहानिशा न करता कार्टून ताब्यात घेण्याचे काम अ‍ॅमेझॉन कंपनीमधील कर्मचारी संदीप सराफ, सचिन पटाळे हे करीत होते.