Breaking News

महसूल विभागाच्या कर वसुली नोटीसमुळे ठाणेकरांमध्ये दहशत

ठाणे, दि. 01, फेब्रुवारी - महसूल विभागाकडून ठाणेकर नागरिक आणि व्यापारी-दुकानदारांना विविध कर वसुलींच्या नोटिसा धाडल्या जात आहेत. कोणतेही कारण नसताना महसूल विभागाकडून अशा नोटिसा पाठविल्या जात असल्याने ठाणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरवणारे हे सरकार नेमके कोणाचे आहे? असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थती होत आहे. त्यामुळे ठाणेकरांनी असे कर भरू नयेत, असे आवाहन ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. 


सध्या ठाणेकर नागरिक, व्यापारी आणि दुकानदारांना नोंदणी, करारनामे इत्यादी करांच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. हे कर भरले नाहीत तर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी धमकी दिली गेली आहे. त्यामुळे ठाणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सरकारी नेत्यांनी परदेशी वार्‍या करून आणि जाहिरातबाजी करून कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला आहे. या उधळपट्टीमुळे सरकारी तिजोरीत खणखणाट निर्माण झाला आहे. त्याकरिता हा खणखणाट भरून काढण्यासाठी सरकारकडून विविध कर वसूल केला जात आहे. जे कर कधी ऐकायला मिळाले नव्हते त्या करांच्या वसुलीच्या नोटीस ठाणेकरांच्या दारात येऊन पडत आहेत.सरकारच्या फसलेल्या धोरणांमुळे व्यापारी, दुकानदार, ठाणेकर कसेबसे पोट भरण्याची कसरत करतो आहे. त्याच्या खिशातून हे सरकार पैसे काढून घेत आहे. त्यामुळे जर भरायचा की पोट भरायचे असा सवाल ठाणेकरांसमोर उभा राहिला आहे. त्याकरिता ठाणेकरांनी असा कोणताच कर भरू नये, महसूल खात्याकडून आलेल्या नोटिसा कचर्‍याच्याया डब्यात टाकून द्याव्यात, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहे.